दुबईतला आरोपी केरळमध्ये पकडला, दक्षिण सायबर पोलिसांची कारवाई

फेडेक्स फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांना कोटय़वधी रुपयांचा चुना लावणाऱया दोघा आरोपींना दक्षिण सायबर पोलिसांनी पकडले आहे. त्यातील एक दुबईतला पाहिजे आरोपी असून पोलिसांनी त्याच्या केरळच्या कोझिकोडे येथे मुसक्या आवळल्या.

कृष्णकांत श्रॉफ (72) हे व्यावसायिक सीपी टॅंक परिसरात राहतात. मनिष नाव धारण केलेल्या भामटय़ाने पोलीस असल्याची बतावणी करत श्रॉफ यांचे आधार कार्ड मनी लॉंडरिंगसाठी वापरले. बनावट कागदपत्र बनवून ती श्रॉफ यांना पाठवली. मग कस्टम अधिकारी असल्याचे सांगत भामटय़ांनी स्काईप आयडीवरून त्यांना संपर्क साधला व कारवाई आणि तपासाची भीती दाखवत त्यांना वेगवेगळय़ा बँक खात्यात तीन कोटी 98 लाख 50 हजार इतकी रक्कम पाठविण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रॉफ यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. खारोटे व पथकाने तपास करून आरोपीला अटक केली.