मिंधे-भाजपच्या राजवटीत कुपोषणाचा कहर; राज्यात तीन वर्षांत 43 हजार बालमृत्यू

राज्यातील बालमृत्यूचे भीषण वास्तव आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. मागील तीन वर्षांत 43 हजार 296 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. जन्म होताना बालकांच्या अवयवांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू न मिळणे, संसर्ग, श्वसनाची समस्या आणि जन्मजात व्यंग या प्रमुख कारणांमुळे बालमृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.

राज्यात बालमृत्यू, अर्भक मृत्यू व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध शासकीय आरोग्य संस्थांच्याद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र आणि आरोग्य संस्थाद्वारे सेवा पुरवल्या जातात, पण तरीही हे सर्व उपाय अपुरे पडत असल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

बालमृत्यू प्रामुख्याने कोणत्या कारणामुळे होतात याची माहिती आरोग्य विभागाच्या अन्वेषण वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी घेतली जाते. आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार 2021-22 या वर्षात 12 हजार 864 बालमृत्यूची नोंद झाली आहे. त्याच्या पुढील वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये बालमृत्यूचे प्रमाण वाढले. या वर्षी 15 हजार 466 बालमृत्यू झाले. त्यानंतर 2023-24 मध्ये 14 हजार 231 बालमृत्यू झाले. एप्रिल 2024 मध्ये 834 बालकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ऑक्सिजन अभावी  3192 मुले दगावली

बालकाचा जन्म होताना मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही तर बालकाचा मृत्यू होतो. मागील तीन वर्षांत ऑक्सिजनच्या पुरवठय़ाअभावी 3 हजार 192 बालकांचा मृत्यू झाला आहे, तर संसर्गामुळे मागील तीन वर्षांत 2 हजार 54 बालकांचा मृत्यू झाला. याच काळात फुप्फुसामुळे निर्माण झालेल्या श्वसनाच्या समस्येमुळे 3 हजार 425 बालकांचा मृत्यू झाला. तसेच मागील तीन वर्षांत जन्मजात व्यंगामुळे 2 हजार 918 बालकांचा मृत्यू झाला. जगभरात ही मोठी समस्या आहे. जगभरात दरवर्षी सरासरी 6 टक्के बालकांचा जन्मजात व्यंगामुळे मृत्यू होत असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

बालमृत्यूची प्रमुख कारणे

  • जन्म होताना अवयवांना कमी प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा
  • संसर्ग फुप्फुसातील समस्येमुळे श्वसनाची समस्या
  • बालकाला जन्मजात व्यंग – यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी आर्थिक तरतूद 3 हजार 827 कोटी रुपये. महिला व बाल विकास विभागासाठीची तरतूद 6 हजार 934 रुपये

वर्ष               मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या

2021-22         (12 हजार 864)

2022-23         (15 हजार 466)

2023-24         (14 हजार 132)

एप्रिल 2024     (834)

मुदतपूर्व प्रसूतीची मोठी समस्या

मागील तीन वर्षांतील बालमृत्यूचे प्रमुख कारण हे मुदतपूर्व प्रसूती आणि कमी वजन अशी असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मागील तीन वर्षांत तब्बल 7 हजार 488 बालकांचा मृत्यूचे कारण जन्मजात कमी वजन आणि मुदतपूर्व प्रसूती असल्याचे पुढे आले आहे.