हॅलो…, हिंदुस्थानात 117 कोटी लोकांच्या हातात फोन

हिंदुस्थानात फोन वापरणाऱ्यांची संख्या 120.5 कोटींवर पोहोचली आहे अशी माहिती ट्रायने दिली. ट्रायने नुकताच यासंबंधीचा अहवाल जारी केला असून यानुसार वायरलेस ग्राहकांची संख्या 117 कोटींहून अधिक झाली आहे, तर वायरलाइन कनेक्शन 3.51 कोटींवर पोहोचले आहेत. हिंदुस्थानात एकूण टेलिफोन ग्राहकांची संख्या मे 2024 च्या अखेरपर्यंत 1203.69 मिलियनहून अधिक वाढून जून 2024 च्या अखेरपर्यंत 1205.64 मिलियन झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 19.11 लाख नवीन वायरलेस सब्सक्रायबर जोडले. वोडाफोन आयडियाने या महिन्यात 8.6 लाख सब्सक्रायबर्स गमावले. बीएसएनएलने 7.25 लाख, एमटीएनएलने 3927, तर आरकॉमने 2 वायरलेस सब्सक्रायबर्स गमावले आहेत. वायरलाइन सेगमेंटमध्ये रिलायन्स जिओने सर्वात जास्त 4.34 लाख नवीन सब्सक्रायबर्स जोडले. यानंतर एअरटेल 44,611 नवीन सब्सक्रायबर्स जोडले. वोडाफोन आयडियाने 21,042 आणि व्हीएमआयपीएलने 13,993 नवीन सब्सक्रायबर्स जोडले. जूनमध्ये बीएसएनएलने सर्वात जास्त 60,644 वायरलेस ग्राहक गमावले.

ब्रॉडबँडच्या संख्येत वाढ

देशात एकूण ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या जूनमध्ये वाढून 94 कोटींवर पोहोचली आहे. यात जिओचे 48.89 कोटी ग्राहक आहेत. भारती एअरटेलचे 28.13 कोटी, व्हीआयएलचे 12.78 कोटी आणि बीएसएनएलचे 2.5 कोटी ग्राहक आहेत.