समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;जालन्याजवळ दोन कार एकमेकांवर धडकल्या, 7 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर

जालना शहरापासून 15 किलोमीटरवर असलेल्या कडवंची गावाजवळ समृध्दी महामार्गावर दोन कार एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही कारचा जागेवरच चूराडा झाला.

28 जूनच्या रात्री मुंबईतील मालाड पूर्व भागातील मन्सूरी कुटुंबातील 6 जण इर्टिका कारमधून नागपूरकडून मुंबईकडे रात्री समृद्धी महामार्गाने वेगाने जात होती. त्याच वेळी जालना तालुक्यातील कडवंची गावानजीक डिझेल भरून स्विफ्ट डिझायर कार चुकीच्या बाजूने समृद्धी महामार्गावर अचानक आली आणि इर्टिका कारवर जोरदारपणे धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, महामार्गावरील बॅरिकेटस् तोडून इर्टिका कार थेट खाली कोसळली. तर धडक देणार्‍या डिझायरचा देखील अक्षरशः चुराडा झाला.

या अपघातात ईर्टिका कारमधील फयाज शकील मन्सुरी, फैजल शकील मन्सुरी, अल्थमेश मन्सुरी (सर्व रा. मालाड, मुंबई) या तीन जणांचा तसेच स्वीफ्ट कारमधील प्रदीप लक्ष्मण मिसाळ (रा. पिंपळगांव, ता. देऊळगावराजा), कारचालक संदीप माणिकराव बुधवंत, विलास सुदाम कायंदे (रा. उमरखेड, ता. देऊळगावराजा), अमिकेत चव्हाण अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. यातील सहा जणांचे मृतदेह जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले असून, एक मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अपघातात ईर्टिका कारमधील शकील मन्सुरी, अल्ताफ मन्सुरी, चालक राजेशकुमार असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनांचे दरवाजे कटरच्या साह्याने तोडून मयत आणि जखमींना रुग्णवाहिकेमधून तातडीने रुग्णालयात हलविले. सर्व तीनही जखमींवर छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले महामार्ग पोलीस पथकाचे उपनिरीक्षक रामदास निकम, सहाय्यक फौजदार शिवाजी साळुंखे, पोहेकॉ. मिसाळ, एमएसएफचे हरजीत राठोड आणि रवि पवार तत्काळ दाखल झाले. यावेळी महामार्ग पथकाचे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक गिरी, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोहेकॉ. रामप्रसाद केवट हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले

मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांना जालन्यातील सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. मृतांच्या कुटुंबीयांनी मयातांचे शव ताब्यात घेतले आहेत. या 6 मृतांपैकी 3 जण सिंदखेड येथील तर 3 जण मुंबई येथील होते. तर एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले असता रस्त्यातच त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. अपघातग्रस्त वाहने हायड्रा मशीनच्या साह्याने हलवून, महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली होती.