निवडणुकीच्या कामावर आहोत… आम्हाला ‘नाइन्टी’ द्या; तोतया एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी बारचालकाला धमकावले

‘आचारसंहिता सुरू आहे, आम्ही एसीबीचे कर्मचारी असून, आम्ही निवडणुकीच्या कामासाठी फिरत आहोत. आम्हाला नाइन्टी द्या, अशी दमबाजी करत बारचालकासोबत हुज्जत घातल्याची घटना मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास दौलताबाद टी पॉइंट ते मिटमिटादरम्यान घडली.

विधानसभा आचारसंहिता लागू झाल्यापासून रात्री अकरा वाजता बीअरबार बंद करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. असे असताना शरणापूर फाट्याजवळ एका हॉटेल व्यावसायिकाने रात्री बार बंद केला होता. हॉटेलचालकाने बार बंद केल्यानंतर कामगार आवराआवर करत होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची गाडी हॉटेलसमोर सायरन वाजवीत आली. त्यामुळे हॉटेलचालक बाहेर आले. चालकाने त्यांना कारमध्ये दारू देण्याचे फर्मान सोडले. त्यावर बारचालकाने आमचा बार बंद झाला आहे, असे सांगितले. त्यावर ‘आम्ही कोण आहे माहिती आहे का तुला? आम्ही निवडणुकीचे काम करतोय, एसीबीचे कर्मचारी आहोत’, असे म्हणत दंडेलशाही केली. त्यावर आम्ही वेळेत बार बंद केला आहे. त्यामुळे आता बार उघडून दारू देऊ शकत नाही. त्यानंतर ‘कोणाला नाही म्हणतो माहिती आहे का,’ असे म्हणत बाहेर येत स्थानिक पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाला कॉल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्याकडून तुम्हाला दारू मिळणार नाही असे बारचालकाने स्पष्ट सांगितले. त्यावर ‘उद्या तुझे हॉटेल बंद करतो’, अशी धमकी देत हे तोतया एसीबी कर्मचारी दौलताबादच्या दिशेने गेले.

जिल्हा प्रशासनाकडून मिटमिट्यातील जुना टोलनाक्याजवळ स्थिर सर्वेक्षण पथकासाठी मंडप तयार करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी अद्यापपर्यंत एकही कर्मचारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा मंडप असा ओस पडलेला आहे.

तो पोलीस कर्मचारी कोण?

आचारसंहिता सुरू होताच शक्तीधाम मंदिर परिसरात असलेल्या टोल नाक्याच्या जागेवर स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसपी) नियुक्त केले जाते. विधानसभा निवडणूक लागताच या ठिकाणी मंडप टाकण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुठलाच कर्मचारी हजर झालेला नाही. त्यामुळे या मार्गावर कुठेच वाहनांची तपासणी होत नसल्याने अशा प्रकारची खोटी माहिती सांगत दमबाजी करणाऱ्या भुरट्यांचे फावले जात आहे. हॉटेलचालकावर दबाव आणण्यासाठी संबंधिताने आपल्या मोबाईलवरून संपर्क केलेला तो पोलीस कर्मचारी कोण? असा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, अशाप्रकारे तोतया पोलीस बनून फिरणाऱ्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.