अभ्युदय बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला असला तरी बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. बँकेचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत, अशी माहिती अभ्युदय बँकेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला असल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आज रविवार असून बँकेच्या 21 शाखांमध्ये सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू होते. खातेदारांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्यामुळे बँकेत खातेदारांची गर्दी झाली नाही. याबाबत खातेधारांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सत्यप्रकाश पाठक यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या प्रमुखपदी सत्यप्रकाश पाठक, व्यंकटेश हेगडे, सनदी लेखपाल महेंद्र छाजेड आणि सुहास गोखले ही टीम प्रशासकीय जबाबदारी सांभाळत आहेत, अशी माहिती बँकेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.