जामिनावर सुटलेल्या गुंडाकडून शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या

महाराष्ट्रात मोकाट गुंडांचे थैमान सुरू असून कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. उल्हासनगरात भर पोलीस ठाण्यात भाजपचा आमदार गणपत गायकवाड याने मिंधे गटाच्या शहरप्रमुखावर गोळ्या झाडल्याची घटना ताजी असताना जामिनावर सुटलेल्या मॉरिस नोरोन्हा या गुंडाने बोरिवलीत शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अभिषेक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस याने स्वतःवरही गोळ्या झाडून जीवन संपवले. राजधानी मुंबईत घडलेल्या या भयंकर घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनी येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांना कार्यालयात बोलवून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. मॉरिसवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. त्याने जुने वाद मिटवायचे आहेत असे सांगून घोसाळकर यांना कार्यालयात बोलवून घेतले. विश्वासाने ते तिथे गेले. तिथे दोघांमध्ये संवाद झाला. दोघांनी फेसबुक लाइव्ह केले. प्रथम मॉरिस बोलला. आपण एकत्र आले पाहिजे. विभागासाठी चांगले काम केले पाहिजे, असे त्याने सांगितले. त्यानंतर घोसाळकर बोलले. विभागातील नगारिकांचे हित कशात आहे ते आपण पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते उठत असतानाच मॉरिस याने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर मॉरिस यानेही स्वतःला दोन गोळ्या घालून जीवन संपवले.

गंभीर जखमी अवस्थेत अभिषेक घोसाळकर यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ते अतिदक्षता विभागात होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे विभागात हळहळ व्यक्त होत आहे. करुणा रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. शिवसैनिकांमधून या घटनेबद्दल तीव्र चीड व्यक्त करण्यात येत होती.

अभिषेक यांचा मृतदेह रात्री उशिरा जेजे रुग्णालयात हलवण्यात आला तर मॉरिस याचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरा फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. गोळीबार करणाऱ्या मॉरिसचे कूपरमध्ये इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर इतर बाबी समोर येणार आहेत.

हल्ला कशामुळे…
हल्ला कशामुळे करण्यात आला, यामागे कोणते कारस्थान होते का, विश्वासाने बोलवून विश्वासघात केला गेला का, यामागे आणखी कुणी आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळ सील करण्यात आले आहे. पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याचा परवाना होता की नाही, हे तपासले जात आहे.

कायद्याचा धाक संपला

गुंडांना राजाश्रय मिळत असल्याने महाराष्ट्रात अशा घटना राजरोस होत आहेत. मग ती आजची घटना असो की नुकताच भाजप आमदाराने केलेला गोळीबार. कॅमेऱ्यापुढे चिल्लर गुंडांची परेड दाखवायला ठीक आहे. पण कायदा वेशीवर टांगणाऱ्यांचा मंत्रालयात मुक्त संचार आहे. यांचे व यांना पोसणाऱयांचे कॉलर कोण व कधी धरणार, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला.

गुंडांना राजाश्रय आणि सामान्य जनतेला मरण हा सरकारचा अजेंडा
गुंडांना राजाश्रय आणि सामान्य जनतेला मरण हा सरकारचा अजेंडा आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. मुख्यमंत्र्यांच्या अवतीभवती गुंड वावरतात मग हे सरकार सामान्यांना काय देणार, असा सवाल शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी केला. हे नालायक सरकार आहे. हे सरकार राहिले तर गोळीबाराच्या घटना होत राहतील आणि सामान्य माणसे अशीच मरत राहतील, असा संताप सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

एका मागून एक गोळीबाराच्या घटना घडत आहेत, इतपं सगळं होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत, बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहे. अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या. आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता आपल्या राज्यात बघत आहे, असा संताप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

…आणि घात झाला
अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आयसी कॉलनी भागात हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर जाणार होते. मात्र मॉरिसने आग्रह केल्याने ते प्रथम त्याच्या कार्यालयात गेले आणि तिथेच घात झाला.

धक्कादायक आणि सुन्नं करणारं, आदित्य ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली
महाराष्ट्राने यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधडय़ा उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये! हे भीषण आहे! अभिषेक घोसाळकर यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देव त्यांना या प्रचंड दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो.

शिवसेनेकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटला. शिंदे यांनी त्याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले होते, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. मॉरिस आणि शिंदे यांच्या भेटीचा फोटोच संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झाला आहे. आज त्याच मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळ्या चालवून त्यांचा बळी घेतला, असे नमूद करत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीच राऊत यांनी केली आहे.

आज अंत्यसंस्कार
अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दौलतनगर रोड नं. 9 येथील औदुंबर निवासस्थान येथे दुपारी 12 वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल व दुपारी 3 वाजता अंत्ययात्रा निघेल, असे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले.