ठसा – जीवनधर शहरकर

>> अभय मिरजकर

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि लातूरमधील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांचे 13 मे रोजी (वयाच्या 96 व्या वर्षी ) निधन झाले. त्यांनी आपला देह दान दिला. लातूरच्या पत्रकारितेमधील विद्यापीठ असेच त्यांना म्हणावे लागेल. त्यांनी सुमारे दीड डझन दैनिकांसाठी बातमीदार म्हणून काम केले. खादीचा हाफ बुशशर्ट, साधी पँट, पायात चप्पल, खांद्यावर शबनम आणि सायकल घेऊन निघालेले जीवनधर शहरकर ऊर्फ गुरुजी ऊर्फ बापू हे खऱया अर्थाने लातूरच्या पत्रकारितेमधील विद्यापीठ. लातूर जिह्यात पत्रकारितेमध्ये आलेल्या कोणत्याही नवपत्रकारास गुरुजींनी केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. शासकीय सेवेतील जिल्हा माहिती अधिकारी पण गुरुजींचा आवर्जून सल्ला घेत असत. लातूरचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इतिहास जाणून घेण्यासाठी अनेकजण त्यांची आवर्जून भेट घेत असत. 11 नोव्हेंबर 1929 रोजी शिरूर अनंतपाळ येथे त्यांचा जन्म झाला. काही काळ ते कुटुंबीयांसह ममदापूर येथे राहिले. वडील कापडाचा, किराणा मालाचा व्यापार गावोगावी जाऊन करत असत. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून ते लातूर येथे आले. विद्यार्थीदशेपासून ते काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होत असत. सुतकताईचे कामही ते शिकले होते. निजाम राजवटीच्या विरोधात जी कामे करणे शक्य होती ती कामे ते करायचे. पत्रक वाटणे, निरोप पोहोचवणे, पत्र पोहोचवणे, वर्तमानपत्रातील बातम्या वाचून दाखवणे, अशी कामे त्यांनी केली.

10 ऑक्टोबर 1946 रोजी चौदाघर मठाची लातूरमध्ये पालखी होती. हरंगुळ येथे सशस्त्र पोलिसांचे ठाणे होते. पालखीच्या बंदोबस्तासाठी अधिक पोलीस ठेवलेले होते. तेव्हा नाक्यावरील बंदूक पळवण्याची योजना त्यांनी आखली होती, पण पोलिसांना ते समजले आणि पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले. त्या वेळी ते बाहेर गेले होते. मित्रांनी तिथेच येऊन सांगितले की, पोलीस घरी आले आहेत हातकडी घेऊन. त्यामुळे तिथूनच ते पळाले. भावाकडून 15 रुपये खर्चासाठी घेतले आणि रेल्वेने सोलापूर गाठले. सोलापूर येथील हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या कार्यालयात ते राहू लागले. त्या वेळी ते इयत्ता नववीमध्ये शिकत होते. सोलापूर येथे त्यांनी विश्वंभरराव हराळकर, फुलचंद गांधी, विमलचंद गांधी, देवीसिंह चौहान, पॅ. लं. बा. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. इंदूरवरून रिव्हॉल्व्हर, काडतूस, बॉम्ब घेऊन आले. बॉम्ब तयार करण्याच्या कामातही त्यांनी सहयोग घेतला. स्टेट काँग्रेसच्या बार्शी कार्यालयात त्यांनी काम केले. निजाम शरण आल्यानंतर पुन्हा ते लातूरमध्ये परतले. नंतर 1950 मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले आणि 6 जुलै 1950 रोजी राजस्थान शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. राष्ट्र सेवादलाशी त्यांचा संबंध आला आणि राष्ट्र सेवादलाच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. साने गुरुजींच्या निधनानंतर महाराष्ट्रात साने गुरुजी सेवा पथकाची कामे झाली. त्यामध्ये जीवनधर शहरकर यांनी सहभाग घेतला. कला पथकामध्येही त्यांनी काम केले. 1954 पासून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला. दैनिक सोलापूर समाचार, संचार, विश्व समाचार, केसरी, सकाळ, प्रभात, लोकसत्ता, नवशक्ती, प्रजावाणी, गोदातीर समाचार, मराठवाडा, अजिंठा, गावकरी, पुढारी अशा सुमारे दीड डझन दैनिकांमध्ये त्यांनी बातमीदार म्हणून काम केले. वयाच्या 70 व्या वर्षापर्यंत त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. विविध पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

लातूर शहर आणि जिह्यात जीवनधर शहरकर गुरुजी शिवांबूचे प्रचारक म्हणून अग्रेसर होते. शिवांबूच्या प्राशनामुळे मला कोणताही आजार होत नाही. आजही मी सायकलवर फिरतो, असे ते सर्वांना सांगत असत. टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक हे गुरुजींचे नित्य भेटण्याचे ठिकाण होते. दररोज सायंकाळी ते या ठिकाणी यायचे. लातूर शहर आणि जिह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक चळवळीमध्ये ते हिरिरीने सहभाग घेत असत.