अब्दुल सत्तारांचा कारनामा, निवडणूक आयोगाला गंडवले

शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारे, तलाठय़ाला लाथाबुक्क्यांनी तुडवणारे, महिलांना जाहीर शिवीगाळ करणारे, काँग्रेस भवनातील खुर्च्या पळवणारे गद्दार अब्दुल सत्तार यांनी आता थेट निवडणूक आयोगालाच हातोहात गंडवले आहे. सत्तार यांनी निवडणूक कामासाठी स्वतःच्या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या 42 शाळांमधील कर्मचाऱ्यांची यादीच दिली नाही. या सर्व कर्मचाऱ्यांचा वापर उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित शाळांना गुन्हे दाखल करण्याचे पत्र देऊन हात वर केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ातील नऊ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी जवळपास 15 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून जिल्हाभरातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, विद्यापीठ, अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळांच्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक पोर्टलवर देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सिल्लोड मतदारसंघात गद्दार टोळीचे उमेदवार असलेले अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी आणि प्रगती एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवण्यात येणाऱ्या 42 शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक पोर्टलवर अजूनही अपलोड केलेली नाही. संतापजनक म्हणजे जिल्हा निवडणूक विभागाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. केवळ अब्दुल सत्तारांच्या 42 शाळांनीच माहिती दिली नसून जिल्हाभरातील 192 शाळांनी माहिती देण्याचे टाळले आहे. या गंभीर प्रकारानंतर जिल्हा निवडणूक विभागाकडून फुटकळ कारणे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे प्रकरणाचे बिंग फुटल्याने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या शाळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र देऊन हात झटकले आहेत.

शपथपत्रात तब्बल 16 चुका

अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात तब्बल 16 गंभीर प्रकारच्या चुका असल्याची तक्रार पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात मालमत्ता, चारचाकी वाहन, हिऱ्यांच्या दागिन्यांबद्दल धडधडीत खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात धादांत खोटी माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी मालमत्तेचा तपशीलही लपवला. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ चुकीचे दाखवण्यात आले. मालमत्तेवरील बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती लपवण्यात आली. चारचाकी वाहनाची माहिती दिली असली तरी त्यात खरेदीचे वर्षच सांगण्यात आलेले नाही. जालना येथील मालमत्ताच या शपथपत्रातून गायब करण्यात आली आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार यांचे शेअर्स आहेत. मात्र, या शेअर्सची धडधडीत खोटी माहिती देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे पुराव्यानिशी सत्तार यांच्या शपथपत्राविरोधात तक्रार केली आहे.