दिल्लीत आपची आतिशी‘बाजी’! भाजपला धोबीपछाड

दिल्लीच्या राजकारणात अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपला धोबीपछाड दिला आहे. मद्य धोरणप्रकरणी केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. भाजपने चहुबाजूने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र जामिनावर सुटताच केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा मास्टरस्ट्रोक खेळला. मंगळवारी आपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली त्यात पुढच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्या शनिवार, 21 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

आप आमदारांच्या बैठकीत आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचे सर्वांनीच स्वागत केले. आतिशी या विद्यमान सरकारमध्ये शिक्षणमंत्री पदाची धुरा वाहत आहेत.

– 2014 पासून सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवणाऱया भाजपला दिल्लीतील सत्ता मात्र सतत हुलकावणी देत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय खेळीपुढे भाजप नेहमीच गारद झाला आहे. केजरीवाल यांनी राजीनामा देताना महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घेण्याचे आव्हानही दिले आहे. दिल्लीची जनता पुन्हा काwल देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, असेही केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. केजरीवाल यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने मद्य घोटाळ्यावरून दिल्लीतील आप सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करणाऱया भाजपची गोची झाली आहे.

केजरीवाल पंधरा दिवसांनी शासकीय घर सोडणार

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी मार्लेना विराजमान होणार आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल पुढच्या 15 दिवसांमध्ये त्यांचे दिल्लीतील शासकीय निवासस्थानदेखील सोडणार आहेत. ‘आम आदमी’ म्हणून ते वावरतील. सुरक्षा, गाडी, ड्रायव्हर आणि कर्मचारी यांसह कोणत्याही व्हीआयपी सुविधांचा लाभ ते घेणार नाहीत, अशी माहिती खासदार संजय सिंह यांनी दिली.