Pandharpur News : कुचकामी दर्शन व्यवस्था, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी ; ढिसाळ नियोजनाचा भाविकांना मनस्ताप

आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून दिंड्या आणि पालखी सोहळ्यांनी पंढरीची वाट धरली असताना पंढरीत मात्र दर्शन रांगेचा बोजवारा उडाल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. चंद्रभागा नदीच्या तीरावर श्री विठ्ठल रखुमाईच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था उभी न केल्याने, रांगेत उभे राहण्याच्या कारणावरुन वारकऱ्यांमध्ये चेंगराचेंगरी, धक्काबुक्की अन् वादावादी झाली.

येत्या दि. 17 जुलै रोजी पंढरपूरच्या आषाढी वारीचा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातून दिंड्या आणि पालखी सोहळ्यांनी पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले आहे. दरम्यान देहू आळंदीच्या प्रस्थान पूर्वी शेकडो वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून मंदिर समितीने तात्पुरत्या दर्शन रांगेची व्यवस्था वेळीच करणे अपेक्षित होते. मात्र दर्शन रांगेची सुविधा उभी न राहिल्याने, भाविकांनी हवी तशी दर्शन रांग लावून घेतली. या रांगेत अनेक वारकऱ्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरु केल्याने, भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी सुरु झाली.

हे प्रकरण एवढ्यावर न थांबता चेंगराचेंगरी अन् वादावादी पर्यंत पोहचले. ही बातमी मंदिर समिती व्यवस्थापना पर्यंत पोहचताच समितीचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तातडीने बांबूचे कठडे तयार करुन रांग सुरळीत केली. आषाढीवारीच्या नियोजनासाठी शासकीय पातळीवर अनेक बैठका होतात. मात्र कागदावर केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले नाही की त्याचा मनस्ताप सर्वसामान्य भाविकांना सहन करावा लागतो.