कच्चा माल देतो, पक्का माल करून द्या असे सांगून रत्नागिरीकरांची फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला आहे. ज्यानतंर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरु केला. आरजू टेकसोल कंपनी फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे
2021 पासून रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात आरजू टेकसोल कंपनीने आपले बस्तान बसवले. कच्चा माल देतो, पक्का माल बनवून द्या असे सांगून लोकांची फसवणूक केली. कच्च्या मालाचे साहित्य देऊन त्याच्या पक्क्या मालाचे साहित्य आम्हीच विकत घेऊ असे नागरिकांना सांगण्यात आले होते. काही दिवसांपुर्वी राजेश पत्याणे या पिडीत व्यक्तीने आपली फसवणूक झाल्याची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. पत्याणे यांना खिळे बनवण्याचे ऑटोमॅटीक मशीन आणि कच्चा माल दिला होता. तसेच त्यांनी गुंतवणूक केलेल्या 18 लाख रुपयांवर 16 टक्क्यांप्रमाणे दरमहा 2 लाख 88 हजार रुपये परतावा देऊ आणि 15 महिने झाल्यानंतर भरलेल्या डिपॉझिटची रक्कम परत दिली जाईल असे खोटे आश्वासन दिले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजेश पत्याणे यांनी फिर्याद दाखल केली.
हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या शाखेने फसवणूक प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये संजय गोविंद केळकर (वय 49, रा. तारवेवाडी, हातखंबा) याला न्यायालयात हजर केले असता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरा आरोपी प्रसाद शशिकांत फडके (वय 34, रा. गावखडी) याला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
फसवणूक झालेल्या 115 जणांचे जबाब
आरजू टेकसोल कंपनीच्या जाळ्यात अनेकजण फसले आहेत. आतापर्यंत पोलीसांनी 115 जणांचे जबाब नोंदवले आहेत. ज्या नागरीकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात भेट देऊन तक्रार दाखल करावी. जबाब नोंदवण्यासाठी त्या नागरीकांना निश्चित वेळ देऊन बोलावण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी डायल 112 किंवा मोबाईल नंबर 9421137380 वर संपर्क करावा.
आरजू टेकसोल कंपनीकडून ज्यांची फसवणूक झाली आहे. त्या सर्वांच्या साक्षी नोंदवण्यात येतील. – धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक