आरजू टेकसोल कंपनी फसवणूक प्रकरण, आणखी एका आरोपीला अटक

रत्नागिरीकरांना पाच कोटी रुपयांचा चूना लावणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीच्या फसवणूक प्रकरणात पोलीसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातीत हा तिसरा आरोपी असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली.

कच्चा माल देतो, पक्का माल बनवून द्या अशाप्रकारे आहिरात करून आरजू टेकसोल या कंपनीने रत्नागिरीकरांना गंडा घातला. सुमारे पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांची 5 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे. 25 हजार ते 40 लाख रुपयांच्या ठेवी 15 महिने, 36 महिने आणि 60 महिन्यांच्या मुदतीवर आरजू टेकसोल कंपनीमध्ये गुंतवण्यात आल्या होत्या. या गुंतवणूकीवर आकर्षक व्याजदर देऊ असे आमिष कंपनीने गुंतवणूकदारांना दाखवले होते. या प्रकरणात सर्वप्रथम प्रसाद फडके आणि संजय केळकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. सध्या हे दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील तिसरा आरोपी संजय विश्वनाथ सावंत, वय 33, रा.पुनस, लांजा याला पोलीसांनी अटक केली. त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्याला आज पोलीसांनी अटक केली. त्याला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

525 गुंतवणूकदारांचे 5 कोटी 92 लाख अडकले

आरजू टेकसोल कंपनीच्या फसवणूक प्रकरणात आतापर्यंत 525 गुंतवणूकदारांनी पोलीसांना जबाब दिले आहेत. या सर्वांचे एकूण 5 कोटी 92 लाख 69 हजार 866 रुपये अडकले आहेत. आरजू टेकसोल कंपनीने भाडेकराराने घेतलेले गोदाम, फॅक्टरी आऊटलेट, कच्चा आणि पक्का माल जप्त करण्यात आला आहे. या जप्त मुददेमालाच्या लिलावाकरीता आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात परवानगी मागितली आहे. तसेच कंपनीच्या बँक खात्यातून झालेल्या सर्व आर्थिक व्यवहारांचे मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाकडून लेखा परीक्षण करण्यात येणार आहे.