दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण? आज ‘आप’ आमदारांची बैठक

दिल्लीतील कथित मद्यधोरण प्रकरणी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दिल्लीचा नवा मुख्यममंत्री कोण होणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर उद्या आपच्या आमदारांची बैठक होणार असून यात दिल्लीचा नवा मुख्यमंत्री ठरणार आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी गोपाल राय, अतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, कैलाश गलहोत, इम्रान हुसैन आणि अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.

गोपाल राय हे आपचे संयोजक असून केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेचे काम पाहातात. ते विद्यमान केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असून बाबरपूरचे आमदार आहेत.

अतिशी या दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षणमंत्री आहेत. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत 15 ऑगस्टला मार्लेना यांनीच विधानसभेबाहेरील राष्ट्रध्वज फडकवला होता.

मंत्री पैलाश गहलोत यांच्याकडे कायदा, न्याय व विधिमंडळ व्यवहार, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती व तंत्रज्ञान, महसूल, वित्त आणि नियोजन अशी आठ खाती आहेत.

सौरभ भारद्वाज यांच्याकडे दक्षता, सेवा, आरोग्य, उद्योग, शहरी विकास व पूर नियंत्रण तसेच पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.

इम्रान हुसैन यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.

केजरीवाल आज देणार राजीनामा

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी उद्या दुपारी साडेचार वाजता केजरीवाल यांना भेटीची वेळ दिली आहे. यावेळी केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवीन नावही त्यांना देणार आहेत.आज दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाबाबत चर्चा झाली. आपच्या राजकीय व्यवहार समितीचीही बैठक सायंकाळी पार पडली. यावेळी सर्व ज्येष्ठ नेते आणि सरकारचे कॅबिनेट मंत्रीही उपस्थित होते. केजरीवाल यांनी नव्या मुख्यमंत्र्यांबाबत वन टू वन चर्चा केली.