गद्दारांवर विश्वास ठेवला तर विश्वासघातच होतो, आदित्य ठाकरे यांचा टोला

ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदाचे चॉकलेट दाखवले होते त्या गद्दारांना खेचून, रडून, ओढूनताणून मिंध्यांनी आता महामंडळाचे अध्यक्ष केले आहे. मिंधे राजवटीचे मोजके दिवस शिल्लक राहिले असताना निवडणुकीच्या तोंडावर ही मंडळं देऊन गप्प केले आहे असे सांगत ‘स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवाल तर असाच विश्वासघात होतो’, असा सणसणीत टोला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकार आणि गद्दार आमदारांना लगावला आहे.

गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून सुरतला पळालेल्या गद्दारांना मिंध्यांकडून राज्यपाल, मंत्रीपदाचे आमिष दाखवले होते. याबाबत संबंधित गद्दारांनी वारंवार आपली ‘हाव’ बोलूनही दाखवली होती. मंत्रीपद मिळेल म्हणून काही गद्दार कोट शिवूनही बसले होते, मात्र सरकारची राजवट संपत आली तरी मंत्रीपद काही मिळाले नाही. तर आता या गद्दारांना महामंडळांच्या अध्यक्षपदी बसवण्याचे प्लॅन मिंधे सरकारकडून सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत मिंध्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यासाठी मिंध्यांनी सुरतला पळून जायला लावले होते, त्या 33 देशांमध्ये गद्दार म्हणून प्रसिद्ध केले, त्यांना निवडणुकीच्या तोंडावर राजवटीचे मोजके दिवस शिल्लक राहिले असताना मंडळं देऊन गप्प केल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. हे गद्दार काय स्वप्नं घेऊन पळाले होते, असे सांगतानाच यांचे कौतुकच वाटते, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, मिंधे सरकाकडून गद्दार आमदार भरत गोगावले यांच्यासह दोन आमदारांची महामंडळांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्राला मागे खेचून भाजपला काय मिळालं?

आदित्य ठाकरेंनी मिंध्यांच्या निर्णयावरून भाजपलाही चांगलेच फटकारले आहे. मिंध्यांकडून गद्दारांना मंडळे दिली जात असताना भाजपला काय मिळालं, असा सवाल करीत हे घडत असताना भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक वाटते असेही ते म्हणाले आहेत. दोन वर्षांत आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठल्या खऱया भाजप कार्यकर्त्यांला काय मिळालं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मिंध्यांनी परस्पर पदं देऊन टाकली, आता यांचं काय? असे सांगतानाच महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपला काय मिळालं? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.