टोलमाफी 50 रुपयांची आणि 5000 कोटींची जमीन अदानीला, कॅबिनेट निर्णयांवरून आदित्य ठाकरेंची टीका

राज्य सरकारने सोमवारी कॅबिनेट बैठकीत मुंबईत येणारे सर्व टोल छोट्या गाड्यांना माफ केले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसात मिंधे सरकारने कॅबिनेट बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका लावला आहे. सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी मिंधे सरकार निर्णय जरी घेत असले तरी या प्रत्येक निर्णयानंतर अदानी ग्रृपला या सरकारकडून भलमोठं गिफ्ट मिळत असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”जसं मी आधी देखील सांगितले आहे की अदानींशी संबंधित सर्व जीआर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत राज्यात आचारसंहिता लागणार नाही. मुंबईत येणाऱ्या सर्व लहान गाड्यांना मुंबईच्या सीमेवर टोलमाफी करण्यात आली आहे. या शेवटच्या क्षणाला घेतलेल्या 50 रुपयांची सूट देणाऱ्या निर्णयाचा आपण आनंद साजरा करत असताना आज अदानी ग्रृपला धारावीच्या तथाकथित पुर्नविकासासाठी आणखी जमिन देण्यात आली आहे. या जमिनीचा बाजारभाव हा पाच हजार कोटी आहे. गेल्या काही कॅबिनेट बैठकांमध्ये काही मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र त्या प्रत्येक निर्णयानंतर या सरकारचे मालक असलेल्या अदानी ग्रृपला एक भलंमोठं गिफ्ट देण्यात आलंय. पालिकेने आक्षेप घेऊनही देवनारचं डम्पिंग ग्राऊंड अदानीला देण्यात आलंय, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारत त्यांची पोलखोल केली आहे.