महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या! आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना पत्र

महानगरपालिकेतील कामगार आणि कर्मचाऱयांना वेळेत पगार देण्यात यावा, दर महिन्याच्या एक तारखेला त्यांना पगार मिळावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी व कामगारांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे विविध कारणांसाठी त्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते त्यांना वेळेवर भरता येत नाहीत. परिणामी त्यांना नाहक दंड भरावा लागत आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

महापालिकेत सध्या सुमारे 90 हजार कामगार आणि कर्मचारी आहेत. तसेच 1 लाख 13 हजार निवृत्तीवेतनधारक आहेत. दर महिन्याच्या एक तारखेला त्यांना वेतन मिळत होते, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ते विलंबाने मिळत आहे. मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेने ही समस्या महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. वेतन जमा होते त्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडेही चौकशी केली होती. त्यानंतरही विलंब थांबलेला नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. कोरोना काळात सर्व यंत्रणा ठप्प असताना महापालिका कामगार, कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रतिदिन 300 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला होता, याचाही उल्लेख आदित्य ठाकरे यांनी पत्रात केला आहे.

सध्याचे सरकार पालिकेचा निधी अनावश्यक गोष्टींसाठी खर्च करीत असून कर्मचारी आणि इतर आवश्यक कामांसाठी राखून ठेवलेल्या मुदत ठेवी मोडण्याचा विक्रम करीत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.