महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईकरांचे, तिथे बिल्डरांसाठी कार पार्किंग होऊ देणार नाही; आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला इशारा

महालक्ष्मीचे 226 एकरचे रेसकोर्स हे मुंबईकरांचे आहे. तिथे हजारो मुंबईकर चालायला, फिरायला, धावायला, व्यायाम करायला जातात. त्या रेसकोर्सच्या जागेवर बिल्डरांच्या फायद्यासाठी भूमिगत कार पार्किंग करण्याचा घाट मिंधे सरकारने घातला आहे. पण कोणत्याही परिस्थितीत तिथे भूमिगत कार पार्ंकग होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मिंधे सरकारकडून रेसकोर्स बळकावण्यासाठी सुरू असलेल्या कारस्थानाची पोलखोल केली. रेसकोर्सच्या जागेची विभागणी करून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे बिल्डरांसोबत साटेलोटे सुरू आहे. शिवसेनेने तो प्रश्न घेतल्यानंतर क्लब हाऊस रद्द केले गेले. आता भूमिगत कार पार्किंग बनवले जाणार आहे, पण केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही, मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. रेसकोर्सच्या पलीकडेच दोन हजार गाडय़ांसाठी कोस्टल रोडजवळ पार्किंगची सुविधा असताना रेसकोर्सवर वेगळे कार पार्किंग कशासाठी असा सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सुरुवातीला मुख्यमंत्री तिथे क्लब हाऊस बांधणार होते. 50 मेंबरशिप त्यातून आयआरडब्लूटीसीकडून त्यांना मिळणार होत्या. पण शिवसेनेच्या विरोधानंतर महानगरपालिका प्रशासकांनी सांगितले की तिथे क्लब हाऊस होणार नाही. नंतर तिथे थीम पार्क आणि अंडरग्राऊंड कार पार्क करणार असे सांगितले. आता पुन्हा ते तिथे थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क करणार असे सांगत आहेत. सेंट्रल पार्क करा नाहीतर जे काही करायचे ते करा, पण भूमिगत कार पार्ंकग कोणत्या बिल्डरसाठी करत आहात, रेसकोर्सजवळ कोणतीही कार्यालये नसताना तिथे कार पार्ंकग कोणासाठी असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत उपस्थित होते.

मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरांना एफएसआय देऊ देणार नाही

रेसकोर्सच्या जागेवर असणाऱया झोपडीवासीयांना जवळच्या एसआरए प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जातील, असे आश्वासन महानगरपालिका प्रशासकांनी दिले आहे. ते एसआरए प्रकल्प नेमके कोणते आहेत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. रेसकोर्सच्या बाजूला असलेल्या एसआरए प्रकल्प गेली वीस वर्षे रखडला आहे. एसआरए आणि बिल्डरचा तिथे वाद सुरू आहे. आता प्रशासक बिल्डरला अतिरिक्त एसएसआय मोफत देऊ असे म्हणत आहेत. हा एफएसआय मुंबईकरांच्या पैशातून येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बिल्डरांना दिला जाणारा अतिरिक्त एफएसआय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खोक्यांतून द्यावा, मुंबईकरांच्या पैशातून तो देऊ देणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले. भाजपने अधिकृत प्रेस नोट काढून रेसकोर्सबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या सूटबूटवाल्या मित्रांसाठी तबेल्यांवर 100 कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेला एक रुपयाही खर्च करायचा असेल तर टेंडर काढावे लागते आणि त्यातून जनतेसाठी कामे करावी लागतात. पण करदात्या मुंबईकरांचे 100 कोटी रुपये रेसकोर्सवर घोडय़ांच्या तबेल्यांसाठी खर्च केले जाणार आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. हे घोडे पोलिसांचे नाहीत किंवा सैन्याचे नाहीत तर गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱया खासगी सूटबूटवाल्या लोकांसाठी आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या या सूटबूटवाल्या मित्रांसाठी मुंबईकरांचे पैसे वापरले जाणार आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

महापालिका प्रशासकांना मुख्य सचिव बनण्याची स्वप्ने पडताहेत

महानगरपालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. रेसकोर्सच्या विभाजनाला मुंबईकर एकत्र येऊन विरोध करत असूनही पालिका प्रशासक ऐकत नाहीत, कदाचित पालिका प्रशासकांना दिल्लीला जायचेय किंवा महाराष्ट्रात मुख्य सचिव बनण्याची स्वप्ने त्यांना पडू लागली आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

निवडणुकांवर डोळा ठेवून कोस्टल रोडचे उद्घाटन

आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामावरून भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटाचा समाचार घेतला. कोस्टल रोड पूर्णपणे बनून तयार नाही, पण श्रेय घेण्यासाठी सरकार त्याचे उद्घाटन करत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. कोस्टल रोड हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते. दर महिन्याला आम्ही कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करून आढावा घ्यायचो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि दिघा रेल्वे स्थानक बनून पूर्ण असतानाही त्याचे उद्घाटन मिंधे सरकारने लांबवले होते, आता कोस्टल रोडचे काम अर्धवट असतानाही केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून त्याच्या उद्घाटनाचा घाट घातला जातोय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रात गँगवॉर, मुख्यमंत्री गँग लीडर

आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही बोट ठेवले. महाराष्ट्रात सध्या गँगवॉर सुरू असून मुख्यमंत्रीच गँग लीडर आहेत, असा हल्लाबोल करतानाच, पॅबिनेट मीटिंगमध्ये तरी कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का? असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. सत्ताधारी आमदारांच्या गुंडागर्दीची यादी द्यायची झाली तर कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पडेल असे ते म्हणाले. सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करतात आणि अशा आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केले जाते, एका अधिकाऱयाचा मुलगा एका महिलेच्या अंगावर गाडी घालतो, आमदाराचा मुलगा व्यापाऱयाचे अपहरण करतो, या घटना पॅमेऱयात पैद असूनही कारवाई केली जात नाही, असे सांगतानाच, अशा प्रकरणांमध्ये यूएपीए म्हणजेच दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.