महाराष्ट्रधर्माची एकजूट दाखवू, महाशक्तीला आडवे करू!

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाशक्ती भाजपकडून जातीजातीत, धर्माधर्मात वाद पेटविला जाईल, त्या विखुरल्या जातील यासाठी प्रयत्न केले जातील, पण महाराष्ट्र धर्म म्हणून आपण एकत्र राहिलो तर या महाशक्तीला आडवे करू, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यांच्या ‘महा निष्ठा, महा न्याय’ सभा आज पुण्याच्या पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव दाभाडे येथे झाल्या. या सभांमध्ये भाजप आणि मिंधे सरकारवर ते तुटून पडले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिभाषा सांगितली. भाजपचे हिंदुत्व हे जाती आणि धर्म विखुरणारे असून शिवसेनेचे हिंदुत्व हे प्राण जाये, पर वचन न जाये, असे असल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्येत उद्या श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे. पण हृदयात राम आणि हाताला काम हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव केले, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्दय़ावरही भाष्य केले. ते म्हणाले की, आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देतो असे म्हणणारे सध्याचे सरकार मराठा समाजाला अद्याप आरक्षण देऊ शकलेले नाही. आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चा काढावा लागतोय. रोजगार मिळवून देऊ, महागाई हद्दपार करू अशी आश्वासने देणारे सरकार आता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काय केले हेच विचारण्यात मशगूल आहे, किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहात? अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

‘आपण आज मोठय़ा जिद्दीने, ताकदीने एकत्र आलो आहोत. गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाहीत, आपण कब्जा करून बसलो नाही. आपल्या डोक्यात मस्ती, माज नाही. आपल्या हृदयात प्रेम आहे ते आपल्याला एकत्र आणत आहे.’

एक खाते चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवले

आदित्य ठाकरे यांनी यावेळी पेपरफुटीच्या मुद्दय़ावर लक्ष वेधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘तलाठी भरती घोटाळा पुढे आला. घोटाळा झाला तो झाला, पण एका विद्यार्थ्याला तर 200 पैकी 214 गुण मिळाले. ज्याला एक खाते चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलेय, असाच हाच घोटाळा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारने मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा

‘आमचे सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे आता कुठे आहेत? त्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा,’ अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप, मिंधे आणि अजित पवार गटाच्या सरकारला सुनावले. ‘मुळात जालन्यातील लाठीचार्ज कोणाच्या सांगण्यावरून झाला? त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यामागील खरा जनरल डायर कोण? हे अद्यापि कळू शकलेले नाही,’ असेही ते म्हणाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेना आयोजित ‘युवा खेळ समिट-2024’ या दोनदिवसीय स्पर्धांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मिंधे पुन्हा सत्तेवर आले तर मंत्रालयही गुजरातला पळवतील

देशात फक्त महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे, यासाठी नवे कलम आणले आहे, पण महाराष्ट्राने किती दिवस अन्याय सहन करायचा? असा सवाल करतानाच आता पुन्हा मिंधे सरकारला सत्तेत आणले तर ते आपले मंत्रालयही गुजरातला पळवतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. दावोस दौऱयावरूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री बर्फात फिरून येतात, पैशाचा चुराडा करतात, वऱहाड निघालं लंडनला तसं सरकार निघालं दावोसला. जातात ते जातात, दलालांनाही घेऊन जातात. देशाला याचा काय फायदा? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

भाजपने दोन पक्ष आणि एक कुटुंब फोडले

महाविकास आघाडीचे चांगले चाललेले सरकार भाजपने गद्दारी करून पाडले, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. ते म्हणाले की, भाजपने दोन पक्ष पह्डले, एक परिवार पह्डला आणि एक अवकाळी खोके सरकार डोक्यावर बसवले. एवढे सगळे करून त्यांना खुर्च्या मिळाल्या, पण महाराष्ट्राला काही मिळाले का? नवा उद्योग राज्यात आला का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आता पेपरफुटी करणाऱयांना फाशीची शिक्षा देऊ असा कायदा आणा, अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, बाळासाहेब फाटक, युवासेना जिल्हा अधिकारी अनिकेत घुले आदी पदाधिकारी या दौऱयात सहभागी झाले होते. पिंपरी येथील सभेत राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.