नदीसुधार नव्हे, हे सुशोभीकरण; हा प्रकल्प रद्द करू! आदित्य ठाकरे यांची ग्वाही

‘नदीकाठ सुधार योजना म्हणजे केवळ मेकअप असून यात मुळा-मुठा नद्यांचे सिमेंटचे बकेट तयार केले जात आहे. यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात नदी सुशोभीकरण प्रकल्पाला स्थगिती देत अनेक दुरुस्त्या सुचविल्या होत्या. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयानेदेखील पूररेषेत विकासकामांमुळे पूरस्थिती निर्माण होत असल्याचा निर्वाळा दिला होता. तरीही उर्मटपणे महापालिकेकडून हा प्रकल्प पुणेकरांवर लादला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प रद्द करू,’ अशी ग्वाही शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर यांनी सादरीकरण करून नदीकाठ सुधार प्रकल्प, मेट्रो प्रकल्प आणि अतिक्रमणे यामुळे मुठा नदीची वहनक्षमता कमी झाली असून भविष्यात पुराचा धोका वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘जगात कोठेही नदीसंदर्भात काम करताना नदीची खोली वाढविली जाते, तसेच तिची रुंदी वाढविली जाते, पण पुण्यात मात्र उलटेच होत आहे. या नदीतील पाणी आधी स्वच्छ करणे गरजेचे असताना तिचे ब्युटीफिकेशन करण्याच्या नावाखाली केवळ मेकअप केला जात आहे. पुण्यात पात्र अरुंद केले जात असल्याने नदी ही सिमेंटचे बकेट होणार आहे. भविष्यात अशा पुरांचा धोका निर्माण होईल. पुणे महापालिकेकडून राबविण्यात येणाऱया नदीसुधार प्रकल्पामध्ये गुजरात येथील साबरमती नदीच्या प्रकल्पाचे मॉडेल कॉपी-पेस्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातच्या आर्किटेक्टला पुण्याची परिस्थिती समजते का? हा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. दिल्ली, अयोध्या आदी शहरांत याच पंत्राटदाराने काम केले आहे. त्यांनी जेथे जेथे काम केले, तेथे पूर येत आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला दुष्काळी भागांतील कामे दिली पाहिजेत,’ असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख-आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे पुणे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक संजय भोसले, विशाल धनवडे, वसंत मोरे, महिला आघाडीच्या पुणे शहर संघटिका पल्लवी जावळे आदी उपस्थित होते.

शाश्वत विकास पाहिजे की भकास…
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदलांमुळे पावसाचे स्वरूप आणि प्रमाण बदलले आहे. ढगफुटी, अतिवृष्टी असे प्रकार सातत्याने घडत आहेत. दुसरीकडे नदीपात्रातील पूररेषेत बांधकामे होत असून त्यासाठी काही ठिकाणी पूररेषेत बदल केले गेले. परिणामी, नदीचे पात्र अरुंद होऊन नदीकाठच्या लोकांच्या घरांत पाणी शिरू लागले आहे. आपण कोणत्या दिशेने चाललोय? मार्ग कोणता निवडला आहे? आपल्याला शाश्वत विकास पाहिजे की भकास पाहिजे याबाबत आपण विचार केला पाहिजे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करूनच नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या
सिंहगड रस्त्यावरील पुराचा फटका बसलेल्या एकतानगर, विठ्ठलनगर भागातील नागरिकांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन व्यथा आणि वेदना जाणून घेतल्या. पुराचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीची त्यांनी सोसायटी, घरे, दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी केलेल्या गैरसोयीच्या तक्रारींवर थेट महापालिका आयुक्तांना पह्न करून संबंधित ठिकाणी तत्काळ सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

मुंबईत ‘माझा लाडका कंत्राटदार’ योजना
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने ‘ब्लॅक लिस्ट’ केलेल्या आणि ठरावीक चार–पाच ठेकेदारांना पंत्राटे दिली जात आहेत. 2023 मध्ये साडेसहा हजार कोटींची पंत्राटे केवळ पाच पंत्राटदारांना दिली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले, मात्र एकही गर्डर अद्यापि टाकला गेला नाही. यातील एक पंत्राटदार पळून गेला. यापूर्वीची कामे अद्यापि पूर्ण झालेली नाहीत, आता पुन्हा नव्याने पंत्राट काढण्याचा घाट घालत ‘माझा लाडका पंत्राटदार’ योजना राबवत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हाती असलेल्या खात्यांमध्ये कामे रखडलेली आहेत,’ असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

प्लॅन ऑफ अॅक्शनची गरज
पूरस्थितीला जबाबदार धरून पालिकेतील अधिकाऱयाचे निलंबन केले आहे. या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, अधिकाऱयांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाही. सर्वस्वी जबाबदार असणाऱयांवर कारवाई झाली पाहिजे. यासाठी प्लॅन ऑफ अॅक्शनची गरज आहे.

ज्यांना कळते त्यांच्याशी चर्चा करू शकतो!
महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाला स्थगिती दिली. पुण्यातील पुरात कोरेगाव पार्कमध्ये सोसायटीची भिंत पडली. सरकारे येतात-जातात, पण आता पुन्हा या प्रकल्पाला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ज्यांना कळते त्यांच्याशी चर्चा करू शकतो; पण दुर्दैवाने कॉण्ट्रक्टरची भाषा मी बोलू शकत नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला.