महाराष्ट्राचा आत्मा, स्वाभिमान पायदळी तुडवून मिंधे-भाजपची राजवट महाराष्ट्राला आर्थिक अस्थिरतेकडे नेतेय; आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मिंधे-भाजपची राजवट महाराष्ट्राचा आत्मा आणि स्वाभिमान पायदळी तुडवतेय, महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील तरुणांना आर्थिक अस्थिरतेच्या दिशेने नेतेय, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मिंधे सरकारच्या काळात वाढलेली बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि उद्योग धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्स सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. मिंधे सरकारच्या राजवटीत महाराष्ट्रातील परप्रांतीयधार्जिण्या उद्योग धोरणाचे 3 पैलू त्यांनी त्यात उलगडून सांगितले आहेत.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे आयोजन का झालेले नाही?

घटनाबाह्य मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे आयोजन झालेले नाही. कदाचित ‘व्हायब्रंट गुजरात’मुळे तो रद्द करावा लागला असेल. पण राज्यात ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’चे आयोजन का झालेले नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तामीळनाडूने अशाच कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांच्या राज्यात चांगली गुंतवणूक आणली हेसुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

गुजरातची जाहिरात करा, पण मुंबईला हक्काचे आर्थिककेंद्र द्या

मुंबईच्या बीकेसीतील आंतरराष्ट्रीय आर्थिककेंद्र (आयएफएससी) गुजरातला हलवले गेले. त्या बीकेसीमध्येच आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये भाजपचे मंत्री पीयुष गोयल जी यांनी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीची (गिफ्ट) जाहिरात केली, मात्र महाराष्ट्राला आवश्यक तेवढे प्रोत्साहन दिले नाही आणि मुंबईकरांनी त्यांना मतदान केले. ‘गिफ्ट’ची जाहिरात करा, पण मुंबईलाही तिच्या हक्काचा आयएफएससी द्या! असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

एमपीसीबीच्या अध्यक्षांची मर्सिडीजला भेट होती की छापा?

  • आपल्या राज्यात येणारे मोठे उद्योग मिंधे-भाजपच्या आवडत्या राज्यांकडे वळवले जात असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नुकताच मर्सिडीज बेंझवर छापा टाकला. एमपीसीबीने अद्याप त्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती नियमानुसार झाली आहे की नाही, याचे उत्तर दिलेले नाही आणि मर्सिडीज बेंझ पंपनीला त्यांनी दिलेली ती भेट होती की छापा? अशीही विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली होती.
  • मर्सिडीज बेंझने कोणत्या नियमांचे उल्लंघन केले याबाबत विचारणा करणारे पत्र आपण एमपीसीबीला लिहिले असून उत्तराची प्रतीक्षा आहे. केवळ एमपीसीबीच्या अध्यक्षांचा अहंकार सुखावण्यासाठी उद्योगांवर कारवाई करायची? आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कंपन्यांना भ्रष्ट राजवटीची अशी गुंडगिरी चालेल का? जे आपल्यावर होणाऱया अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाहीत, त्यांचे काय? अशा शब्दांतही आदित्य ठाकरे यांनी जाब विचारला आहे.