आश्वासनांनी खोके सरकार जनतेच्या तोंडाला पाने पुसतेय! आदित्य ठाकरे यांचा सांगलीतील मेळाव्यात घणाघात

राज्यातील खोके सरकार हिटलरशाही वृत्तीने काम करीत आहे. त्यामुळे राज्याचे संविधान धोक्यात आले आहे. या सरकारने पाकीट संस्कृती निर्माण केली असून, खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग हे खोके सरकार करत आहे, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.

पश्चिम महाराष्ट्रातील झंझावाती दौऱयात दुसऱया दिवशी आज आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरनजीक वाघवाडी येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ‘ताकदीने लढायचं आणि जिंकायचं आहे आणि आम्ही जिंकणारच आहोत, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील हे खोके सरकार हिटलरशाही वृत्तीने काम करीत आहे. त्यामुळे राज्याचे संविधान धोक्यात आले आहे. संविधान टिकवण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी आम्ही लढा देत आहोत. दिल्ली काबीज केल्याशिवाय हे अशक्य आहे. त्यामुळे आपली एकजूट महत्त्वाची आहे. येत्या तीन-चार महिन्यांत जाती-जातीत तंटे निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यापासून तुम्ही सावध राहा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

सध्या महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरून निघाला आहे. कोणत्याही कामासाठी ‘पाकिटं’ घेतली जात आहेत. ‘पाकीट संस्कृती’ या खोके सरकारने निर्माण केली आहे. खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग हे खोके सरकार करीत आहे, मात्र स्वतःसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी सुरू आहे. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यातील जनरल डायर कोण, हे कळत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. यावेळी शिवसेना नेते-सचिव, खासदार अनिल देसाई, उपनेते-संपर्क नेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, उपनेते-संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

‘सयाजी’च्या लॉबीत गर्दी

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा पश्चिम महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. काल आदित्य ठाकरे यांच्या गारगोटी आणि कोल्हापूर येथील सभांना कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज दौऱयाच्या दुसऱया दिवशी आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये सकाळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणांनी गर्दी केली. ही गर्दी हॉटेलच्या लॉबीपासून मुख्य रस्त्यापर्यंत गेली होती, याची माहिती मिळताच आदित्य ठाकरे यांनी खाली येऊन तरुणाईशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे आले की पाऊस येतो

आजचा सांगली दौरा अचानकपणे झाला. गेल्या वेळी झालेल्या दौऱयात याच वाघवाडीत माझा सत्कार झाला होता. त्यावेळी पाऊस सुरू होता. आजही पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. माझं नाव सूर्याचे असले तरी आदित्य ठाकरे आले की पाऊस येतो असे लोक म्हणतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.