रविवारी 21 जानेवारी रोजी मुंबई टाटा मॅऱेथॉन 2024 पार पडणार आहे. दरम्यान शनिवारी सकाळी मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या धावपटूंबाबत काळजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून मिंधे सरकारवर टीका केली आहे.
”आजची हवेची गुणवत्ता आणि प्रदूषण पाहून, उद्या टाटा मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या सर्व धावपटूंची मला काळजी वाटते. गेल्या 2 दिवसांसारखी स्वच्छ हवा उद्या देखील असावी, अशी मी प्रार्थना करतो. जो खरंच एक चमत्कारच होता”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी धावपटूंबाबत काळजी व्यक्त केली आहे.
ट्विटरवरून त्यांनी एक पोस्ट शेअर करत धावपटूंना मुख्यमंत्र्यांना प्रश्न करण्याचे आवाहन केले. आहे. ”मॅरेथॉनला झेंडा दाखवण्यासाठी तेथे उपस्थित घटनाबाह्य सत्ताधाऱ्यांना विचारा, गेल्या वर्षभरात हवेची गुणवत्ता सुधारण्याबाबत त्यांनी काहीच का केले नाही? त्याबद्दल ते कुठे काही बोलले देखील नाही. लाखो मुंबईकरांच्या निवेदनांना त्यांनी प्रतिसाद का दिला नाही? शहरात ठिकठिकाणी खोदून, काही न काही कामकाज काढून प्रदूषण वाढविण्यासाठी बिल्डर आणि कंत्राटदारांना त्यांनी मोकळीक दिली आहे का?, तसेच पालिका आयुक्तांना विचारा ते उद्या धावणार आहेत का? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईची हवा प्रदूषित करण्यासाठी आपल्या कंत्राटदारांना, बिल्डरांना मोकळं रान दिलं आहे; ते आयुक्तांना पटतंय का? ते सहसा मुंबईकरांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत, पण ही विचारण्याची संधी आहे”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.