फक्त लुटण्याचेच काम नाही तर मुंबई कोणाला तरी फुकटात देण्याचे काम सुरू आहे – आदित्य ठाकरे

‘ही लोकं मुंबईवर राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाही. त्यामुळे धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईच कोणाला तरी फुकटात देण्याचे काम सुरू आहे’, अशी जोरदार टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केली आहे. सोमवारी मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला.

”धारावीला जे काही चालले आहे, ते अतिशय भयानक आहे, भितीदायक आहे. हे फक्त मुंबई लुटण्याचेच काम नाही तर मुंबई कोणाला तरी फुकटात देण्याचे काम सुरू आहे. ही लोकं मुंबईवर राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाही. मुंबईवर आपली पकड बसवू शकत नाही तर मग नक्की काय करायचे. म्हणून मग मुंबई अदानींच्या घशात घालायची हे या मिंधेनी ठरवले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यापासून एमएमआरडीएची लूट, पीएमआरडीची लूट, पूणे महानगर कॉर्पोरेशनची लूट असो नागपूर असो मुंबईच्या महानगरपालिकेची लूट सुरू आहे. हे सगळं घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगर विकास खात्यात येतं आणि ही लूट त्यांच्याचकडून होत आहे. या लूटीचे पैसे ते कुठे देतात, काय करतात हे त्यांनाच माहिती. पण तेच महाराष्ट्रातच्या लूटीला जबाबदार आहे, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.

मी धारावीचा टीडीआर बद्दलचा घोटाळा आपल्यासमोर आणलेला आहे. तिथे साधारणपणे एक ते दीड लाख परिवार अपात्र  होणार आहेत. त्यांचा देखील एक वेगळाच घोटाळा आहे. लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधील जे गद्दार आमदार आहेत त्यांनी सांगितले होते की मदर डेरीचा प्लॉट आम्ही रद्द करु आणि अदानींना देणार नाही. पण अजूनपर्यंत तो निर्णय रद्द झाला नाही. याचा अर्थ ते खोटं बोलत होते आणि त्यांच्यात तो रद्द करण्याची हिंमत नाही. कारण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसलेले आहेत. तसेच मिहीर कोटेचा यांनी सांगितले होते की, मुलुंडमध्ये पीएपी, पीटीसी असेल हे रद्द केले जाईल ते देखील केले नाही. या दोन्ही गोष्टी आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिले.