घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे मुंबईतल्या दोन पुलांचे उद्घाटन रखडले

मुंबईची वाहतूककोंडी फोडणारे देशांतर्गत विमानतळ जंक्शनवरील उड्डाणपूल आणि अंधेरीतील गोखले पूल हे पुनर्बांधणीनंतरही उद्घाटनाअभावी रखडले आहेत. त्यामुळे मुंबईकर नाहक तासन्तास ट्रफिक जाममध्ये अडकून पडले आहेत. हे केवळ घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे घडत आहे.

साध्या साध्या मूलभूत सुविधांसाठी मुंबईकरांची अवस्था दयनीय झाली आहे. मुंबईकरांच्या या त्रासाकडे भाजपप्रणीत मिंधे राजवट सरळ डोळेझाक करत असून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून हे दोन्ही पूल आजच मुंबईकरांसाठी खुले करावेत, असे आव्हान शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.

मुंबईतील धोकादायक उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्यात येत असून त्यातूनच मुंबईतील विमानतळ जंक्शनवरील उड्डाणपूल हा एमएमआरडीएकडून आणि अंधेरीतील गोखले पुलांची पुनर्बांधणी महापालिका आणि रेल्वेने पूर्ण केली आहे. मात्र, तरीही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे हे दोन्ही पूल रखडल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ’एक्स’ मीडियावर संताप व्यक्त केला.

मीडिया, पत्रकार, मुंबईकरांना आवाहन
किती लाजिरवाणं आहे हे सगळं! मी मीडिया, पत्रकार आणि मुंबईकरांना दोन्ही पुलांना भेट देण्याचं आमंत्रण देतोय. त्यांनी स्वतः येऊन प्रत्यक्ष पहावं की, कशाप्रकारे ही भाजपप्रणीत मिंधे राजवट मुंबईची वाट लावत आहे आणि मुंबईकरांना सतत त्रासात ढकलत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

विमानतळ जंक्शनवरील पूल आठवडाभरापूर्वी पूर्ण
हा उड्डाणपूल आठवडाभरापासून पूर्णपणे तयार असूनही केवळ घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना लोकांसाठी वेळ नसल्याने त्याचे उद्घाटन होत नाहीये. दररोज रात्री इथल्या खांबांवरचे दिवे सुरू असतात आणि मुंबईकर मात्र तासन्तास ट्रफिकमध्ये अडकलेले असतात, असे आदित्य ठाकरे यांना ‘एक्स’मध्ये म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दणक्यानंतर आज संध्याकाळपासून गोखले पुलाची एक मार्गिका होणार सुरू
उशिरा होत असलेल्या आणि अर्धवट तयार झालेल्या गोखले पुलाच्या उद्घाटनाचा मुद्दा आम्ही उपस्थित केल्यानंतर, आता उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता एका मार्गिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आमचा दबाव कामी आला याचा आनंद आहेच, पण प्रश्न असा आहे की, 5 दिवसांपूर्वीच काम झालेलं असतानाही मुंबईकरांनी उद्यापर्यंत तरी का थांबावं? तसंच… जे आमदार खोटं बोलले होते की ‘मॅस्टिक वर्क’ बाकी आहे आणि महानगरपालिका आयुक्त खोटं बोलत होते की, लोड टेस्टिंग बाकी आहे, त्याचं काय झालं? मी केलेल्या ट्विटनंतर 12 तासांच्या आतच सगळं काम पूर्ण झालं? देशांतर्गत विमानतळाजवळच्या पुलाचं उद्घाटन कधी होणार? त्याचप्रमाणे पुण्यात रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो तयार आहे आणि एक महिन्यापासून उद्घाटनाच्या तारखेची वाट पाहते आहे. विमानतळाचे टर्मिनल-2 गेल्या 6 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. खोके सरकारचे व्हीआयपी बिल्डर आणि पंत्राटदारांची हांजी हांजी सोडून जनतेची सेवा करण्यावर कधी भर देणार, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’मध्ये मीडिया मेसेजमध्ये विचारला आहे.