दावोस दौऱ्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसोबत दलाल कशासाठी चाललेयत? आदित्य ठाकरेंचा सवाल

मिंधे सरकारकडून जनतेच्या पैशांची भरमसाट उधळपट्टी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. सोबत कर्मचारी, अधिकारी असा सुमारे 70 जणांचा लवाजमाही त्यांच्यासोबत जाणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर सडकून टीका केली आहे.

वाचा पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –

माझ्या भितीमुळे ते चार्टर्ड प्लेन घेऊन जात नाहीयेत आणि 20 कोटींच्यावर खर्च दाखवू नका अशा सूचना गेल्यात.

दावोस दौऱ्यासाठी किती लोकांना परवानगी मिळाली आहे याची मुख्यमंत्री कार्यालयातून प्रेस नोट काढावी.

किती लोकं जाणार आहेत? मुख्यमंत्री तिथे कोणाला भेटणार याची यादी जाहीर करावी.

मागच्या दावोस दौऱ्यावर घटनाबाह्य सरकारने 28 तासांमध्ये जवळपास, 40 कोटी रुपये खर्च केला होता.

दावोस दौऱ्याला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसोबत दलाल कशासाठी चाललेयत? एमओयू बरोबर ते तिथे पैसे वगैरे देणारेत का?

इतकी लोकं दावोसमध्ये मजा करण्यासाठी चाललेत का? सही करायला किती लोकं लागतात?

दावोस दौऱ्यासाठी दलाल, मित्रांसोबत 50 लोकांचे अधिकृत डेलिगेशन आहे. पण सोबत मुलांनासुद्धा घेऊन चाललेत.

आमचा रेसकोर्सच्या विभागणीला पूर्णपणे विरोध आहे. आरडब्ल्यूआयटीसीला पण विरोध करू. तिथे हजारो मुंबईकर चालायला, खेळायला, योगा करायला जातात, लाफ्टर क्लब आहे. या जागेची विभागणी करून तुम्ही तिथे काय करणार?

बीएमसी घोडाच्या तबेल्यावर 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा अधिकार त्यांना कुणी दिला?

रेसकोर्सची जागा भाजपप्रणित सरकार गिळायला बघतेय. यावर भाजपची भूमिका काय असेल त्यांनी स्पष्ट करावी.