तासाभराच्या पावसातच मुंबई ठप्प, एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले नसतील; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मुंबई, पुणे आणि ठाण्यात बुधवारी पावसाने दाणादाण उडली. मुंबईत पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तर रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पण यावर राज्यातील महायुती सरकारमधून एकाही मंत्र्याने किंवा नेत्याने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजप-मिंधेंवर हल्लाबोल केला.

काल पाऊस तीन-चार तास चालला, पण सुरुवतीच्या आर्ध्या एक तासाच्या पावसातच मुंबई ठप्प झाली होती. 2005 ला ढगफुटी झाली, त्यावेळी 9 तास पाऊस झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता, अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. नवीन मेट्रोचं उद्घाटन झालं, तिथे पाणी गळायला लागलं. रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई महापालिकेचं ट्विटर हँडल, मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल जे आम्ही सुरू केलं होतं, या सर्व गोष्टी ज्या नागरिकांना मदत करायच्या, तातडीने प्रतिसाद द्यायच्या, त्या काल कुठे होत्या? मुख्य म्हणजे कुठेही काहीही घडलं की घटनाबाह्य सरकारमधले दोन पालकमंत्री, त्यातले एक बिल्डर आहेत आणि दुसरे सतत फिरत असतात. ते काल कुठे होते? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजप-मिंधेंवर हल्ला चढवला.

कालच्याच एका कार्यक्रमात घटनाबह्य मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई खड्डेमुक्त करणार. ही त्यांची जुनीच टेप होती. त्यांच्या घटनाबाह्य राजवटीला आता जवळपास अडीच वर्षे झाली. मागच्या वर्षाच्या रस्ते घोटाळा किंवा या वर्षाचा रस्ते घोटाळा, हे दोन्ही मी एक्स्पोज केलं. अजूनही रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत. पण कुठूनही अर्धा किलोमीटरचं रस्त्याचं काँक्रीटीकरणचं काम झालेलं नाही. त्या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांनाच विचारलं. कहीं पाणी भरा है क्या, देखा आपने? आणि बोलताच क्षणी पुढच्या आर्ध्या तासात पाणी भरायला लागलं. मुख्य म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे असेल महाराष्ट्रातील अनेक शहरांत दोन वर्षांत महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महापौर नाहीत, नगरसेवक नाहीत. नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे? या निवडणुका झाल्या नसतील तरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सगळा कारभार हा प्रशासकांच्या माध्यमांतून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवतात. त्यांच्या काही टोळ्या आहेत. प्रत्येक गोष्ट ठरवून दिलेली आहे. रस्त्यांचं कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचं? इमारतीचं कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचं? ह्या कॉन्ट्रॅक्टर्सना कोणी सांभाळायचं? हे ठरलेलं आहे. प्रत्येक कामात एक्स्कलेशन झालेलं आहे. कुठेही काम झालेलं नाही. एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने किंबहुना देशानेही कधी पाहिलेले नसतील, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

गेली दोन वर्षे आम्ही एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत. मुंबई सारख्या शहराला गेली दोन वर्षे 15 असिस्टंट कमिश्नर नाहीत. अजूनही नियुक्ती झालेली नाही. हे का होतंय, कशासाठी होतंय? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजीनिअर आहेत. पण वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत. मुंबई, पुणे, ठाणे असेल… व्हीआयपीए येणार असले की रस्त्यावर वाहतूक पोलीस असतात. पण काल जी वाहतूक कोंडी झाली. रेल्वे प्रवाशांचे हाल झाले, मेट्रोमध्ये मोठी गर्दी झाली. घाटकोपर स्टेशनवरील व्हिडिओ सर्वत्र फिरतोय. एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलेलं नव्हतं. एवढी भयानक राजवट कधीही पाहिलेली नव्हती, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आम्ही 10-12 वर्षांपूर्वी सर्वात अद्ययावत डिझास्टर कंट्रोल रूम उभारली. आताच्या राजवटीचे मंत्री आहेत, त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्यात येईल असं वाटतं. असं नसतं. ते काही थिएटर नाही, पिक्चर बघण्यासाठी की, अरेव्वा इथे पाणी किती तुंबलं, तिथे पाणी किती तुंबलंय बघायला. डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे की जे अधिकारी आहेत त्यांना कळावं की तिथे काय आपण लगेच कारवाई केली पाहिजे. काही कर्मचारी रस्त्यावर दिसले पाहिजेत. ज्यांनी त्वरीत आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत ते कुठेही दिसले नाहीत. काल रेल्वे असेल, बीएमसी असेल, एमएमआरडीए असेल, एसआरए असेल, या सर्व संस्था ज्या मुंबई चालवतात आणि ज्या टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणवतात. त्या काल होत्या कुठे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

तुम्ही महाराष्ट्र लुटला, आमची मुबंई लुटली, पुणे, ठाणे लुटलं. जे नॅशनल हायवे असतील गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले. तुमचे कॉन्ट्रॅक्टर आमच्यावर लादले, तुमचं राजकारण आमच्यावर लादलं. तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं. पक्ष फोडायचे, परिवार फोडायचे, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचा हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे, ती काल आपण पाहिली. आर्ध्या तासाच्या पावसात कसं मुंबई, पुणे, ठाणं भरलं होतं? पाणी सगळीकडे तुंबलं होतं. हे काही पहिल्यांदा झालेलं नाही, पुण्यात तर ऑगस्टमध्ये दोन वेळा पूर येऊन गेले. काल तिसऱ्यांदा पाणी तुंबलं. यावर बोलण्यासाठी एकतरी व्यक्ती जे आमच्यावर टीका करत असतात भाजपमधून, मिंधेंमधून काल तुम्हाला टीव्ही समोर उत्तर देताना दिसून आले का? असे आदित्य ठाकरे म्हणाले.