दडपशाही करून भाजपने देशाचे वाटोळे केले, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

दडपशाही करून भाजपने देशाचे वाटोळे केले असल्याचा घणाघात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यातील खोके सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून जे लोक सत्यासाठी लढत आहेत, त्यांच्यामागे ईडी लावण्यात येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

जळगाव, शिरसोली, कासोदा तसेच भडगाव येथे गुरुवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या दणदणीत सभा झाल्या. या सभांमध्ये आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला अक्षरश: झोडपून काढले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, अ‍ॅड. हर्षल माने, शहरप्रमुख शरद तायडे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना भाजप सरकार माओवादी, नक्षलवादी, खलिस्तानी ठरवत आहे. देशाच्या अन्नदात्यावर अश्रुधूर चालवला जात आहे. राज्यात तर अराजकच माजले आहे. चिंधीचोर सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास खुंटला असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये भ्रष्टाचार धुतला जात असून, हे चित्र भीतीदायक असल्याचे ते म्हणाले.

भाजप हिंदुत्वाच्या गप्पा मारते पण त्यांचे हिंदुत्व घर पेटवणारे असून आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी सरकार फोडाफोडीत मग्न असल्याचा आरोप केला. मोदी सरकारने कश्मिरातून कलम 370 हटवले, या निर्णयाचे आपण स्वागत केले. पण आजही कश्मीरमध्ये कश्मिरी पंडित आपल्या घरी जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मोदी सरकारच्या काळात तरुण, शेतकरी, महिला, नोकरदार सगळेच अस्वस्थ आहेत. पण सरकारला त्याची कोणतीही फिकीर नाही. राममंदिर झाल्यावर रामराज्य येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु जे सरकार शेतकर्‍यांवर लाठ्या चालवते त्यांच्या तोंडी रामराज्याची भाषा शोभत नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

राज्यातून वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरातला पळवली गेली. पण सरकारला हे कळलेच नाही. अनेक विकास कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आली. ती या चिंधीचोर सरकारने बंद केली. दररोज पेपरफुटीच्या बातम्या येतात. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. पण या सरकारला त्याचे काही पडले नाही. आला दिवस घालवणे एवढेच काम सरकार करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.