लोकशाहीची यांनी खिल्ली उडवली आहे, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना गुरुवारी सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. यावरून सध्या सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केजरीवालांच्या अटकेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदारा आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. तसेच देशात कशाप्रकारे लोकशाहीचा खेळखंडोबा केला जातोय याची उदाहरणं देत त्यांनी भाजपवर ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे.

”लोकशाही नाही तर आता संपूर्ण व्यवस्थेची मस्करी करून ठेवली आहे. विरोधकांमधील एका मुख्यमंत्र्याला पदावर असताना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका मुख्यमंत्र्याने त्याच्या अटकेच्या आधी पदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षांची बँक खाती गोठवली आहेत. महिनाभरापूर्वी चंदिगढ येथे झालेल्या महापौर निवडणुकीतला भयंकर प्रकार कॅमेरात कैद झाला होता. सरकार ईडी सीबीआय इनकम टॅक्स सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांचे कंबरडे मोडले जातेय. इतकं सगळं होत असताना आता आपण एक निप:क्ष व स्वतंत्र लोकशाही असलेला देश आहोत असं खोटं बोलायचं का? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

 

दरम्यान अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी अटकेनंतर ते पहिल्यांदाच समोर आले आणि प्रतिक्रिया व्यक्त केली. केजरीवाल यांनी सांगितलं की, मी तुरुंगात असो वा बाहेर असो, माझं जीवन देशासाठी समर्पित आहे. केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात आणले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची ही पहिली प्रतिक्रिया होती.

केजरीवाल हे अटक झालेले पहिले विद्यमान मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, आप नेत्यांनी आज देशव्यापी निषेध आंदोलन केलं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अटकेनंतर ठिकठिकाणी निदर्शनं सुरू झाली आहेत. आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या दिल्लीतील काही प्रमुख मंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.