ईव्हीएमविरोधी आंदोलन आता थांबणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

आमदार म्हणून सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आम्ही ईव्हीएमविरुद्ध लढत राहू, ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरूच राहील यात वाद नाही. कारण हे एक-दोन दिवसाचे आंदोलन नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

देशाची जनता आज विचारतेय की सत्य काय आहे. आम्ही तर जिंकलेले उमेदवार आहोत, तरीही आम्ही विचारतोय की, आम्हाला बॅलेट पेपरवर मतदानाचा अधिकार का मिळत नाही? व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठय़ांची मोजणी करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी केली होती ती का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.

निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो

आपल्या मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान केले जात असेल तर आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, असे शिवसेना आमदार सुनील राऊत म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाल की, सर्वांचीच भावना आहे की बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, पण निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून चालतो, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला. शेवटच्या काही तासांत झालेल्या मतदानाची टक्केवारी अचानक वाढली कशी त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने जनतेत येऊन द्यावे, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.

 

बावनकुळे मकाऊचे संविधान मानतात, आम्ही हिंदुस्थानचे

शपथविधीनंतर आदित्य ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांनी शपथ न घेऊन संविधानाचा अवमान केला आहे असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्याचा चांगलाच समाचार आदित्य ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, ‘चंद्रशेखर बावनकुळे चीनचे, मकाऊचे संविधान मानतात. आम्ही हिंदुस्थानचे संविधान मानतो. आम्ही या देशाच्या संविधानासाठी लढत आहोत. ज्या संविधानाचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार दोन वर्षे बसवले, महाराष्ट्राची लूट केली. ईव्हीएमचा जुगाड करून जिंकलात आणि संविधानाचा अपमान केलात त्याविरोधात आम्ही लढतोय.’

 

अबू आझमी ही भाजपची बी टीम

शिवसेनेने पुन्हा विचारधारा बदलल्याचा आरोप करत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अखिलेश यादव जी समाजवादी पार्टी चालवतात ती उत्तम प्रकारे चालवतात आणि ते ‘इंडिया’ आघाडीचे एक महत्त्वाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी भाजपची बी टीम असल्यासारखे काम करतात. यापूर्वीही त्याचा अनुभव आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही त्यांनी कोणाची मदत केली ते जाहीर आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे, आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे आहे, भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.