चीनवर दाखवायची ताकद केंद्र सरकार देशाच्या अन्नदात्यावर दाखवत आहे, आदित्य ठाकरे कडाडले

आपल्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोहोचलेल्या शेतकऱ्यांसमोर सरकारने सैन्यबळ उभं केलं आहे. एकिकडे लडाखमध्ये चीन घुसखोरी करत असताना तिथे दाखवायची ताकद केंद्र सरकार देशाच्या अन्नदात्यावर दाखवत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली.

आता आपलाच झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अशी गर्जना करत आदित्य ठाकरे रणमैदानात उतरले आहेत. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात झालेल्या झंझावाती सभांनंतर शनिवारी लालबाग येथेही आदित्य ठाकरे यांची सभा झाली. केंद्रातील मोदी सरकार तसंच राज्यातील मिंधे सरकारवर टीकास्त्र सोडताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आता आपण रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात लोकांवर हीच वेळ आली आहे. दहा वर्षं अच्छे दिन आयेंगे असं ऐकायचो. पण अच्छे दिन आलेत का, नाही आले. पण फक्त महाराष्ट्रापुरते ते आलेले नाहीत, तर देशातल्या प्रत्येक राज्यांत खासकरून भाजपशासित राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. लोकांना आंदोलनं करावी लागत आहेत. ती चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करायचा प्रयत्न करत आहे. लडाखमध्ये मागच्या दोन आठवड्यात साधारण 40 हजार लोकं रस्त्यावर उतरून मागणी करत होती. त्यांची मागणी हीच होती की, आम्हाला केंद्रशासित राहायचं नाही. आम्हाला आमच्या हक्काचा मुख्यमंत्री, विधानसभा द्या. 2019मध्ये म्हणजे पाच वर्षांपूर्वी कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव आणला होता. त्याला आपणही पाठिंबा दिला होता. ते बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. पण, ते झाल्यानंतर लडाखला वेगळं करून केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं. केंद्रशासित म्हणजे तिथे केंद्राचं थेट लक्ष असायला हवी. मात्र, तिथले स्थानिक, भूमिपुत्र म्हणताहेत की आमच्याकडे कुणाचं लक्ष नाही, आमचा आवाज कुणीही ऐकत नाही. मग हे केंद्र सरकार नक्की कुणाचं आहे, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

उपस्थित शिवसैनिकांना उद्देशून त्यांनी तिथे असलेल्या ड्रोनच्या साहाय्याने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांची कैफियत सांगितली. ‘इथे सभेत असलेल्या ड्रोनमध्ये कॅमेरा आहे, म्हणून तुम्हाला भीती वाटत नाही. पण याच ड्रोन मधून तुमच्यावर अश्रुधूर सोडला असता तर तुम्हाला भीती वाटली असती. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल की पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश इथले लाखो शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढून जात आहेत. दीड वर्षांपूर्वीही शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले होते, त्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मागण्या पूर्ण करू असं सांगितलं, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून मागे फिरले. दीड वर्षं होऊनही एकही मागणी पूर्ण झालेली नाही. आज जेव्हा शेतकरी पुन्हा एकदा त्याची आठवण करून द्यायला जात आहेत, दुर्दैव असं की याच ड्रोनमधून त्यांच्यावर अश्रुधूर सोडले जात आहेत. याच ड्रोनमधून ते पाहतात शेतकरी कुठपर्यंत आले आणि त्यांच्या रस्त्यात मोठे खिळे ठोकण्यात येत आहेत. जेणेकरून ते शेतकरी बांधवांच्या पायाला लागतील, त्यांचे ट्रॅक्टर पंक्चर होतील आणि ते दिल्लीला पोहोचू शकणार नाहीत. हे केंद्राचे कारनामे आहेत, असे आसूड त्यांनी यावेळी ओढले.

‘इथे बसून आपल्याला शेतकरी किती राबतो हे आपल्याला कळणार नाही. पण, ज्या भाज्या, फळं, धान्य आपल्या घरी कसं येतं, ते त्याच शेतकऱ्यांच्या शेतातून येतं, ज्यांच्यावर आज हे केंद्र सरकार लाठीचार्ज करतंय, अश्रुधूर सोडतंय. असं सैन्यबळ तिथे दिल्लीत उभं केलेलं आहे, जणुकाही ते चीन सीमेवर उभे आहेत. आंदोलनात अडथळे यावेत म्हणून रस्ते खोदून ठेवले आहेत, मोठ्या गाड्या लावून ठेवल्या आहेत. जणू काही पाकिस्तान किंवा चीन चालून येणार आहे. चीन तर लडाखमध्ये घुसलेला आहे, पण तिथे ताकद न दाखवता केंद्र सरकार ती देशाच्या अन्नदात्यावर दाखवतंय हे किती दुर्भाग्य आहे.’ अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर टीकास्त्र सोडलं.