Net Exam Cancelled : ‘परीक्षा पे चर्चा’ करणाऱ्यांमुळे 9 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप; आदित्य ठाकरे संतप्त

NEET परीक्षेतील गोंधळाने आधीच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले असताना आता NET परीक्षा देणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. देशात 18 जूनला झालेली UGC NET 2024 परीक्षाच केंद्र सरकारने रद्द केली. याचा फटका देशातील 9 लाख विद्यार्थ्यांना बसला आहे. आता यावरून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेतला आहे.

UGC NET परीक्षा रद्द केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. परीक्षांमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 18 जूनला घेतलेल्या NET-UGC परीक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच, ती परीक्षा काल तातडीने रद्द केली. जो घोळ NEET च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची ‘कातडी बचाव’ हालचाल केंद्राने केली. पण त्याने ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसानच झालं. 9 लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि ह्या परीक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला. मनस्ताप झाला तो वेगळाच. आता त्यांना पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ करणाऱ्यांना घोळ घातल्याशिवाय देशभरात कुठलीही परीक्षा घेता येऊ नये ह्यापेक्षा मोठा विरोधाभास काय? युवकांच्या प्रश्नांचं फक्त भांडवल करणाऱ्या ह्या केंद्र सरकारने दिखाऊपणा बंद करून खरे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. तरुणांच्या भविष्याशी खेळणं बंद करावं. आता ह्या परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करतील का? असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी घणाघात केला आहे.