पालिका आयुक्तांच्या पथकाचं नेतृत्व खासदार कसं करू शकतो? आदित्य ठाकरे यांचा मिंधेंना सवाल

दावोसमध्ये झालेले करार हे वर्षभरापासून खोळंबलेले होते आणि फक्त मुख्यमंत्र्यांना बर्फात खेळता यावं म्हणून दावोस दौऱ्याचा घाट घातला गेला, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच, नेदरलँड येथे झालेल्या विविध पालिका आयुक्तांच्या दौऱ्याचा फोटो दाखवून त्यांनी या पथकाचं नेतृत्व खासदाराकडे कसं जाऊ शकतं? त्यासाठी घटनेत काही बदल केले आहेत का? आणि यांना परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी आहे का, अशी प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केली.

मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी दोन महत्त्वाचे विषय मांडले. आधी त्यांनी शिवसेना नेत्यांवरील ‘ईडी’पीडेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राजन साळवी यांच्या घरावर धाड पडली. तरी त्यांनी भूमिका घेतली की आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच राहणार. रवींद्र वायकर यांच्यावरही दबावतंत्र वापरलं जात आहे की भाजपमध्ये या, मिंधे गटात या. पण सगळे निडरपणे लढत आहेत. आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. जर केलं असतं, तर आम्ही शरण आलो असतो, जसे बाकीचे वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत. कोणीतरी घटनाबाह्य मुख्यमंत्री झालंय, कुणी उपमुख्यमंत्री झालंय, काही मंत्री झालेत. पण, वायकर, राजन साळवी, सूरज चव्हाण हे सगळे लढताहेत आणि सांगताहेत की चूक केली नाही. चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो पण आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आहोत, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर निशाणा साधतानाच आदित्य ठाकरे यांनी आणखी एका दौऱ्याचा खुलासा करत मिंधे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवून आदित्य यांनी विचारलं की, कधीही आपण एखाद्या खासदाराला डेलिगेशन लीड करताना पाहिलं आहे का? जे नगर विकास मंत्र्याचं काम आहे, ते खासदार करताहेत. महायूडीडी या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड असलेल्या या फोटोतलं हे पथक नेदरलँडला गेलं होतं. यात खाली खासदारांचा उल्लेख आहे. त्यांनी जॅकेट कुठल्या कंपनीचं घातलंय, त्या खर्चात जात नाही मी. या फोटोच्या खाली मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे महापालिका आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त तसंच एमएमआरडीए अधिकारी आणि एका खासदाराचा उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे या पथकाचं प्रमुखपद एका खासदाराकडे होतं. आता हे खासदार मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत का? कारण, वंशवादावर भाजपला आक्षेप आहे. तसंच, अशा प्रकारे एखाद्या पथकाचं नेतृत्व खासदार कधीपासून करू लागले? त्यासाठी घटनेत काही बदल करण्यात आला आहे का? तसंच, यांनाही परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केला.