मुंबई आपलीच राहणार, आम्ही महाराष्ट्र गाजवणार! आदित्य ठाकरे यांचा वज्रनिर्धार

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रणमैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात सुरू झाला आहे. गिरगावात आज शिवसैनिकांचा दणदणीत आणि खणखणीत मेळावा झाला. या मेळाव्यात अफाट गर्दीच्या साक्षीनेच आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकले. गेली दोन वर्षे आपण सगळेच ज्याची वाट पाहत होतो ते 2024 हे वर्ष आले आहे. आता आम्ही दिल्लीला दाखवून देणार… हे वर्ष आमचे आहे आणि आम्ही महाराष्ट्र गाजवणार, मुंबई-महाराष्ट्र आपलेच राहणार, असा वज्रनिर्धार आदित्य ठाकरे यांनी केला.

आपलं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. हे राष्ट्रीयत्व टिकवायचं असेल तर देश हा आपला पहिला धर्म असला पाहिजे आणि देश वाचवायचा असेल तर प्रत्येकाला आजपासूनच प्रचाराला उतरावं लागेल. खोके सरकार आणि भाजपप्रमाणे खोटं बोलायचं नाही तर जे सत्य आहे ते घरोघरी जाऊन सांगायचं. जनतेला जागं करायचं. मतदान नीट झालं तरच देश वाचेल, संविधान आणि लोकशाही टिकेल… हे ध्यानात ठेवा.

ईडी, सीबीआय, आयटी भाजपचे मित्र पक्ष
देशात भाजप अनेक पक्षांना मित्र म्हणून जवळ घेत असला तरी त्यामध्ये फारसा दम नाही. तर ईडी, सीबीआय आणि आयटी हे भाजपचे प्रमुख तीन मित्र पक्ष असून तेच निवडणुका जिंकून देण्यासाठी मोठी भूमिका निभावत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणाऱया भाजपला लगावला. तसेच भाजप दोन धर्मांत, दोन समाजांत भांडणे लावून निवडणुका जिंकत असून, ते देशासाठी घातक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 12 च्या वतीने आज दक्षिण मुंबईत ठाकूरद्वार येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱयांवर जोरदार हल्ला केला. सध्या महाराष्ट्रासह देशात सत्ताधाऱयांकडून बनवाबनवी सुरू आहे. प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टी सभा, जाहिरातींच्या माध्यमातून खऱया असल्याचे भासवले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशच संकटात आला आहे. तो वाचवायचा असेल तर सत्ताधाऱयांचा खोटारडा चेहरा उघडा पाडा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. त्यासाठी आतापासूनच प्रचाराला लागा, खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई देशाला चालवत असल्याने दिल्लीश्वरांची वाकडी नजर
देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या प्रत्येकाला सामावून घेण्याची मुंबईची क्षमता आहे. मुंबईतून मिळणाऱया महसुलावर देश चालतो. त्यामुळेच दिल्लीश्वरांची मुंबईवर वाकडी नजर पडली आहे. त्याचाच भाग म्हणून ते वेगवेगळय़ा कारणाने मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक उद्योग मुंबई आणि महाराष्ट्रातून पळवत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईकर आता नुसते हे उघडय़ा डोळ्यांनी पाहणार नाही, तर येणाऱया निवडणुकांमध्ये त्याचा बदला घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खोके सरकार गुजरातमधून चालते
मुंबई आणि महाराष्ट्राला हवे तसे लुटता यावे म्हणून भाजपने बेकायदेशीरपणे खोके सरकार आपल्या डोक्यावर ठेवले आहे. हे सरकार गुजरातमधून चालते. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत; मात्र आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री केवळ दाढी खाजवत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच राज्याचे सीएम म्हणजे करप्ट माणूस, करप्ट मंत्री आहेत. त्यांना टेंडरमध्ये एवढा इंटरेस्ट आहे की, ते आईस्क्रीमही ‘टेंडर कोकोनट’चं खातात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

…अन्यथा शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आम्ही खुला करू
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे काम झालेले असतानाही तो अद्याप खुला केला जात नाही. कारण यांना पंतप्रधानांची वेळच मिळत नाही. मात्र मुंबई-नवी मुंबईकर ट्रफिकचा त्रास सहन करत आहेत. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत सरकारने जर सागरी सेतू खुला केला नाही तर आम्ही खुला करू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. तसेच काम पूर्ण होऊनही दिघा स्थानक, उरण रेल्वे लाइनचे उद्घाटन होत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. कोस्टल रोडचे कामही सरकारमुळे लांबले असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

अध्यक्षांनी खरा न्याय दिला तर 40 गद्दार बाद होणार
विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि लोकशाहीला धरून न्याय दिला तर 40 गद्दार नक्कीच बाद होतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

आता मोठमोठी होर्डिंग लागतील
देशात आता लोकसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्यामुळे मुंबईत आणि प्रमुख रस्त्यांवर यांच्या नेत्यांची भली मोठी हार्ंडग लागतील, वृत्तपत्रांमध्ये मोठमोठय़ा जाहिराती छापून येतील; कारण लोकांना समोर आपणच दिसलो पाहिजे अशीच भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान स्वतःला प्रमोट करतायत
देशातील जनता महागाईने त्रासलेली असतानाही त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला प्रमोट करत आहेत. त्यांना जनतेच्या समस्यांचे सोयरसुतक नसल्याचे शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. भाजप आणि पंतप्रधान आता प्रभू रामाच्या नावाने राजकारण करत आहेत. त्यावर भरभरून बोलत आहेत. पण मणिपूर जळत असताना, तेथे महिलांची धिंड काढली गेली यावर ते एक अक्षरही बोलले नाहीत. त्यामुळे तत्त्वनिष्ठ प्रभू रामाचे नाव घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना नसल्याचा टोला शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी लगावला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र. 12च्या वतीने विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला. यावेळी मेळाव्याला आमदार अजय चौधरी, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरविंद नेरकर, अरुण दुधवडकर, मनोज जामसुतकर, उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी आमदार दगडू सकपाळ, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, सुरेश पाटील, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.

50 खोक्यांचे आता 500 खोके झालेत
बेकायदेशीर सत्तेवर बसलेल्यांनी प्रशासकाच्या मदतीने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. 6080 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला आहे. स्ट्रीट फर्निचरमध्ये 263 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यामुळे आपले सरकार आल्यानंतर यांना जेलमध्ये जावे लागणारच, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले. तेव्हा उपस्थितांनी ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तो धागा पकडत आदित्य ठाकरे म्हणाले, आता नुसते 50 खोके नाहीत, तर 50 खोक्यांचे 500 खोके झाले असल्याचे सांगताना, अपना भी टाईम आयेगा असे सांगत मुंबईला लुटणाऱयांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.