मिंधे-भाजपाने सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली; बदलापूर गोळीबार प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचा संताप

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदालपूर रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा गोळीबार झाला. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजपा सरकारवर हल्ला चढवला आहे.

आदित्य ठाकरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबार प्रकरणावर ट्विट करत संताप व्यक्त केला. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळतच चालली आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार असोत, कोयता गॅंगसदृश घटना असोत की वारंवार होणारे गोळीबार…. महाराष्ट्रातील शहरं आणि गावं या गुन्हेगारीने ग्रासून गेलेली आहेत. काल तर बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाला आणि राज्याचे गृहमंत्री मात्र पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, खोटा इतिहास शिकवणे, प्रचार करणे यातच व्यस्त आहेत. आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली या मिंधे-भाजपाने, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजपा सरकारवर घणाघात केला.

नक्की काय घडलं?

बदलापूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी 6 वाजता गोळीबाराची घटना घडली. पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात विकास पगारे (वय – 25) याने त्याच्या साथीदारांवर रेल्वे स्थानकात गोळीबार केला. ही घटना फलाट क्रमांक 1 वरील होम फलाटाजवळ घडली. या घटनेत एक जण जखमी झाला असून पोलिसांनी आरोपी विकास पगारे याला अटक केली.

विकास पगारे आणि त्याचे साथीदार हे उल्हासनगरातील सराईत गुन्हेगार आहेत. पैशांच्या व्यवहारासाठी त्यांची बदलापूर येथे मीटिंग होणार होती. त्यासाठी ते रेल्वेने आले होते. मात्र अचानक विकास पगारे याने टोळीतील शंकर संसारे याच्यासह दोघांवर गोळीबार केला. हा जखमी झाला. त्यात संसारे गोळीबारानंतर पगारे हा ट्रॅकवर उतरून पळत असताना रेल्वे पोलिसांनी झडप घालून त्याला अटक केली. त्याच्याकडील दोन पिस्तूल आणि कट्टे हस्तगत केले. या टोळीतील रोहित धोत्रे हा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणाचा कल्याण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)