मुंबईतील 1080 एकर जागा अदानींच्या घशात फुकटात घातल्यानंतर मिंध्यांनी महानगरपालिकेचे तीन मोक्याचे भूखंड विकायला काढले आहेत. ते भूखंडही अदानी आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा कॉन्ट्रक्टर मंत्री (सीएम) एकनाथ शिंदे यांचा डाव आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.
आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मिंधे सरकारचा मुंबई लुटीचा छुपा डाव समोर आणला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेची आर्थिक घडी बसवलेली होती. शाळा, प्राथमिक आरोग्य पेंद्रे, मेडिकल कॉलेज अशा सोयीसुविधा देताना कधीही मुंबईकरांवर टॅक्स लावला नाही. शिवसेना महापालिकेत सत्तेवर असताना 92 हजार कोटींच्या ठेवी वाढवल्या. परंतु मिंध्यांच्या राजवटीत पालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे. मिंध्यांनी रस्ते घोटाळय़ासह अनेक घोटाळे करतानाच महापालिकेचे हजारो कोटी लुटले. पालिका तुटीत असल्याचे सांगून प्रशासकांच्या माध्यमातून मुंबईतील तीन मोक्याचे भूखंड मिंधे सरकारने विकायला काढले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोळीवाडय़ांचेही क्लस्टर करून बिल्डरांच्या घशात घालतील
क्रॉफर्ड मार्पेटच्या मंडईची जागा विकल्यानंतर मिंधे सरकार वरळी, वांद्रे, जुहू, वर्सोवा येथील कोळीवाडेही तिथे क्लस्टर करून अदानींच्या घशात घालेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. माशांच्या वास आला की नाकाला रुमाल लावणाऱया पियूष गोयल यांच्यासारख्या लोकांसाठी मिंध्यांची ही धडपड सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमचे सरकार आल्यावर फौजदारी चौकशी करू
मुंबई, महाराष्ट्राची लूट करणाऱयांविरोधात उद्धव ठाकरे आणि आपला लढा सुरू आहे. सगळे लुटारू आमचे प्रतिस्पर्धी आहेत, असे सांगतानाच, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मोक्याच्या जागा विकत घेण्यासाठी लिलावात सहभागी होणाऱयांची फौजदारी चौकशी करू, त्यांनी किती पैसे आणि खोके मिंध्यांना आणि सरकारला दिले ते बाहेर काढू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
हुतात्मा स्मारक विकून तिथे गुजरातचा जी लावतील
महानगरपालिका विकण्याचे भाजप आणि मिंध्यांचे काम सुरू आहेच, पुढे कदाचित हुतात्मा स्मारकही लिलावात काढून तिथे अदानीचा ए किंवा गुजरातचा जी लावतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरही ठिकठिकाणी मिंध्यांचे होर्डिंग दिसत आहेत, पोस्टर दिसत आहेत, रेल्वेमध्ये जाहिराती सुरू आहेत याकडे लक्ष वेधतानाच आचारसंहितेत कुणाला कोणती परवानगी आहे हे निवडणूक आयोगानेच सांगावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
या जागांचा लिलाव करणार
– कोळी बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करतात ती क्रॉफर्ड मार्पेटजवळची छत्रपती शिवाजी महाराज मंडई
– मलबार हिलचे बेस्टचे पॉवर स्टेशन
– वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा
महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना, कोणत्याही समित्या नसताना प्रशासकांना लिलाव करण्याचा अधिकार दिला कोणी, असा संतप्त सवाल करतानाच याला सर्वस्वी मुख्यमंत्री शिंदे जबाबदार आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.