मिंध्यांनी 1080 एकर जमीन अदानींच्या घशात फुकटात घातली, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मिंधे सरकारने मुंबईतील 1080 एकर जमीन उद्योगपती अदानींच्या घशात फुकटात घातली. महाझुटी सरकारने आज त्यांचे रिपोर्ट कार्ड जाहीर केले, पण त्यांच्या रिपोर्ट कार्डचे नाव महाराष्ट्र आता डिपोर्ट कार्ड करेल. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला डिपोर्ट करणाऱया या सरकारला राज्यातील जनताच डिपोर्ट करेल, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना दीड हजारांहून अधिक रक्कम देणार, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी मिंधे सरकार – भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराचा आणि गैरकारभाराचा पाढाच वाचला. देशातील प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकणार होते, आता फक्त 1500 दिले, पुढे त्याचे 15 रुपये होतील, अशी खिल्ली आदित्य ठाकरे यांनी उडवली.

मिंधे सरकारने धारावीतील जमीन अदानींना दिलीच, पण बरोबर अनेक सवलतींचीही खैरात केली. मुंबईतील पाच नाक्यांवर टोलमुक्तीची घोषणा केली. टोल होताच किती… 45-50 रुपये. सर्वसामान्यांना 50 रुपयांची सूट दिली, अदानींना मात्र धारावी आणि लगतची 540 एकर जमीन आणि मुंबईतील इतर ठिकाणची 540 एकर जमीन अशी हजारो हेक्टर जमीन आंदण देऊन 50 हजार कोटी रुपयांचा फायदा सरकारने करून दिला, असा आरोप करतानात आदित्य ठाकरे यांनी अदानींना दिलेल्या जमिनीचा लेखाजोखाही मांडला. धारावीकरांसाठी वांद्रे रेक्लेमेशन येथे ट्रान्झिट पॅम्प उभारा अशी मागणीही त्यांनी केली.

न्यायप्रविष्ट असताना देवनारची जमीन दिलीच कशी?

देवनार डम्पिंग ग्राऊंडची 124 एकर जमीन अदानी समूहाला देण्याचा निर्णय मिंधे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या जमिनीबद्दल राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये वाद आहे. तो वाद न्यायालयात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देवनारची जमीन अदानींना दिलीच कशी, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्या अरबी समुद्राचे नावदेखील अदानी समूह करून टाकतील असाही टोला त्यांनी लगावला. महाविकास आघाडीचे सरकार येऊ देत, मग मिंध्यांनी केवळ भ्रष्टाचारासाठी घेतलेले निर्णय आणि काढलेली टेंडर आम्ही रद्द करू, असा इशाराही त्यांनी दिला.

अदानींना दिलेली जमीन
कुर्ला 21 एकर
मुलुंड, भांडुप आणि 255 एकर
कांजूरमार्ग
मढ 140 एकर
देवनार 124 एकर

– महाविकास आघाडी सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद केली जाणार असा दावा मिंधे सरकारमधील पक्षांकडून केला जात आहे. तो आदित्य ठाकरे यांनी खोडून काढला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे देण्याची भूमिका यापूर्वीच मांडली आहे, असेही ते म्हणाले.

मिंध्यांसाठी ‘सबका मालिक अदानी’

भाजप आणि मिंधे यांचे मालक अदानी आहेत. त्यांच्यासाठी सगळा खटाटोप चालला आहे. मी उपस्थित केलेला एक तरी मुद्दा त्यांनी खोडून दाखवावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर कुठेही समोरासमोर चर्चा करायला तयार आहे, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले. अदानींना धारावीव्यतिरिक्त जी जमीन दिली आहे त्यावर 7 लाख चौरस फुटांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यातून अदानी 1 लाख कोटी कमावणार आहेत. सबका मालिक एक साईबाबा आहेत, पण सरकारसाठी सबका मालिक अदानी झालाय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महायुती नव्हे महाझुटी

मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकांमध्ये महायुती सरकारने जनतेला आकर्षित करण्यासाठी अनेक निर्णय घेतले असे पत्रकारांनी सांगितले असता, महायुती नव्हे ती महाझुटी आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. थोडे काहीतरी देतो असे दाखवून सरकारने स्वतःचा आणि अदानींचा मोठा फायदा करून घेतला असे ते म्हणाले.