स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात तर असाच विश्वासघात होतो; आदित्य ठाकरेंचा मिंधे गटाला टोला

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या आमदारांना महामंडळाचे वाटप सुरू केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडताना ज्या आमदारांनी ‘आता आम्हीच मंत्री होणार, कोट शिवून ठेवला आहे’ वगैरे… वगैरे… विधाने केली होती त्यांचीही महामंडळावर बोळवण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजप आणि अजित पवार गटाला डावलून हे महामंडळ वाटप करण्यात आले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला जोरदार टोला लगावला आहे.

मिंधे गटातील तीन-चार आमदारांना महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाचे वाटप करण्यात आले आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला टोला लगावत भाजपचाही समाचार घेतला. गुरुवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली.

यात त्यांनी म्हटले की, खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी 3 गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं. ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, 33 देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं! कौतुक आहे यांचं…काय स्वप्नं घेऊन पळाले होते! एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर असाच विश्वासघात होतो, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

बरं हे होताना अजून कौतुक वाटतं ते भाजपा कार्यकर्त्यांचं…2 वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठच्या खऱ्या भाजपा कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधे नी परस्पर पद देऊन टाकली… यांचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपाला काय मिळालं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.