राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकला! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आदित्य ठाकरेंनी उठवला आवाज

MPSC आणि IBPS च्या परीक्षा 25 ऑगस्टला म्हणजे एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 25 ऑगस्टला IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्यात. याविरोधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकलायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

आपल्या X वरील पोस्ट मध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र आणि राज्य सरकार युवकांचा विचार अजिबात करत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. MPSC आणि IBPS च्या परीक्षा पुन्हा एकदा एकाच दिवशी होणार आहेत, ज्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. 25 ऑगस्टला IBPS ने देशपातळीवरील परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही आपल्या दोन महत्त्वाच्या परीक्षा आयोजित केल्यात. दोन्ही परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे’.

आपल्या पोस्ट मध्ये आदित्य ठाकरेंनी मागणी केली आहे की, ‘राज्यातल्या राजवटीने विद्यार्थ्यांचा विचार करून राज्यसेवा आयोगाची परीक्षा तातडीने पुढे ढकलायला हवी. मुळात वारंवार असं घडत असेल तर केंद्राशी योग्य संवाद आणि समन्वय हवा’.

सरकार वर टीका करताना आदित्य ठाकरे लिहितात की, ‘विद्यार्थ्यांबाबत असंवेदनशील राहून चालणार नाही, हे ह्या राजवटीला समजायला हवं!’