हा अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का? आदित्य ठाकरे यांचा मोदी सरकारला सवाल

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरात जलदगतीने विमानतळ विस्तारीकरणाबाबत भाष्य केले असे असले तरीही या संपूर्ण योजनेत महाराष्ट्रचा कुठेच समावेश का दिसत नाही? हा अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का? असा खणखणीत सवाल शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे.

पुणे येथील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत अर्थ मंत्र्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेला एक प्रस्ताव सध्या सत्तेत असणाऱयांनी रद्द केला. महाराष्ट्राच्या उद्योग, वाणिज्य आणि शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी पुण्यात नवे विमानतळ गरजेचे आहे. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. जुन्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम गेल्या 5 महिन्यांपासून रखडले आहे. परंतु घटनाबाह्य मिंधे सरकारला त्याचे उद्घाटन करण्यात बिल्कूल रस नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

देशाचं भविष्य बनवणारे बजेट

आजचे अंतरिम बजेट हे विकसित हिंदुस्थानच्या चार स्तंभ युवा, गरीब, महिला आणि शेतकरी या सर्वांना बळ देणारे आहे. हे बजेट देशाचे भविष्य निर्माण करणारे बजेट आहे. या बजेटमध्ये 2047 पर्यंत विकसित हिंदुस्थानच्या पायाला मजबूत करण्याची गॅरंटी आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

मित्रकाल बजेट

अंतरिम बजेट हे मित्रकाल बजेट आहे. केंद्र सरकारकडे देशाच्या भविष्याच्या निर्माणासाठी कोणतीही रूपरेषा नाही. मित्रकाल बजेटमध्ये रोजगारसंबंधी उल्लेख नाही. महागाई कमी करण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. असमानता दूर करण्यासाठी कोणताही प्रयत्न दिसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

हे निवडणूक बजेट

हे बजेट आगामी 2024 लोकसभा निवडणुकीला डोळय़ांसमोर ठेवून बनवण्यात आले आहे. आयकर स्लॅबमध्ये कोणताही दिलासा दिला नाही. बजेटमध्ये देशातील बेरोजगारीच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करण्यात आले अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

बजेटमध्ये काहीच नाही

या बजेटमध्ये काहीच नाही. खरे बजेट जुलैमध्ये येईल. देश पुढे जायला हवा. महागाई कमी व्हायला हवी. रोजगार निर्माण व्हायला हवा. औद्योगिक विकास व्हायला हवा. कश्मीरमध्ये पर्यटन संख्या वाढायला हवी असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

खोटं बोलण्यात धन्यता

अर्थमंत्री केवळ स्वतःची पाठ थोटपून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था चांगली असेल तर गेल्या 9 वर्षात तब्बल 12,88,293 अतिश्रीमंत व्यक्ती आणि उद्योजकांनी देश का सोडला? असा सवालही वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सर्व घटकांची निराशा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या शेवटच्या केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही ठोस नाही. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय व सामान्य गोरगरीब जनतेसाठी कोणतीही मदत नसणारा सर्व घटकांची पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

अर्थहीन अर्थसंकल्प

केंद्रातील भाजप सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आहे अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सामान्यांना स्थानच नाही

सामान्य माणसाला या अर्थसंकल्पात स्थान दिलेले नाही. केवळ मोठमोठय़ा गोष्टी करणारा हा अर्थसंकल्प आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी अमृतकाळ घोषित केला, मात्र गेल्या वर्षभरात एकही अमृताचा थेंब मिळाला नाही अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

नावीन्यशून्य अर्थसंकल्प

आजचा अर्थसंकल्प हा निराशाजनक, नकारात्मक, नावीन्यशून्य आहे. बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही योजना अर्थसंकल्पात नाही. दलित आणि आदिवासींसाठी या अर्थसंकल्पात काहीच दिले गेलेले नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा या वर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.