एकीकडे हिंदूंवर अत्याचार, दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी पायघड्या; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं

बांगलादेशमध्ये जुलै महिन्यात आरक्षणविरोधात जनता रस्त्यावर उतरली आणि उग्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान हिंदू समाजाला विशेषकरून टार्गेट करण्यात आले. आजही तिथला हिंदू समाज भीतीच्या छायेखाली जगत आहे. एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना दुसरीकडे बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी हिंदुस्थानमध्ये पायघड्या टाकल्या जात आहेत. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला फटकारले आहे.

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही सामने चेन्नईत खेळले जाणार असून पहिला सामना 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री एक ट्विट केले. यात त्यांनी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराचा दाखला देत काही बोचरे सवाल विचारले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, बांगलादेशचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. BCCI नेच त्यांना पायघड्या घातल्यात! आता मी पराराष्ट्र मंत्रालयाकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे की, काही माध्यमं आणि सोशल मिडियात सातत्याने सांगितलं जात असल्याप्रमाणे गेल्या 2 महिन्यात बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत का?

जर खऱ्या असतील, तर हिंदूंवर बांगलादेशात अन्याय होत असताना त्यांच्या क्रिकेट संघाला भारतात येऊ देण्याच्या निर्णयामागे केंद्र सरकार वर कोणाचा दबाव आहे? आणि जर याबातम्या खोट्या असतील तर, सोशल मिडियातून आणि माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या ह्या बातम्या (बांगलादेशात हिंदू समाजावर अत्याचार!) हा भाजपाने भारतातल्या निवडणुका जिंकण्यासाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला ‘जुमला’ तर नाही ना? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

हिंदूवर जर बांगलादेशात खरंच अत्याचार होत असतील, तर भाजपा प्रणित केंद्र सरकार त्यांच्याच क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेलं यांचे हिंदुत्व? की त्यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांसाठीच असतं? असे टोकदार सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.