आदित्य ठाकरे यांचं भाकीत खरं ठरलं, इक्बाल सिंह चहल आता मुख्यमंत्र्यांच्या ‘सेवेत’

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवल्यानंतर आता त्यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता महापालिकेत भ्रष्टाचार केल्यानंतर इक्बाल सिंह चहल हे मुख्यमंत्र्यांच्या सेवेत रुजू झाले आहेत, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दणका देत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना महापालिकेच्या आयुक्तपदावरून हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र चहल यांना हटवून चार दिवस उलटले तरी त्यांच्या नियुक्तीबद्दल कोणतीही घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नव्हती. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करत इक्बाल सिंह चहल यांना मुख्यमंत्री कार्यालयातील पद दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यांची ती शक्य़ता अखेर खऱी ठरली असून चहल यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी ही नियुक्ती

चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती झाल्यानंतर Aaditya Thackeray यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ”मी दोन दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलंय. महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयातनियुक्त झाले आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री (CM – contractor Minister) ना मदत करण्यासाठी या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झालीये. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षिस आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.