मतदारांवर दबाव असूनही रांगा लावून मतदान केलं! आदित्य ठाकरेंकडून मुंबईकरांचं कौतुक

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी पार पडलं. मात्र, मुंबई आणि परिसरातील मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळागोंधळ पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी साध्या सोयीसुविधांचा अभाव, मतदानाची संथ प्रक्रिया, वाढतं ऊन यांमुळे मतदार चांगलेच वैतागले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा समाचार घेतला असून मुंबईकरांच्या या स्पिरीटचं कौतुक केलं आहे.

एक्सपोस्टवर आदित्य ठाकरे यांनी लिहिलं की, आज अतिशय भयंकर व्यवस्थापन पाहायला मिळालं. निवडणूक आयोग ही संस्था जी एक राष्ट्र आणि एक निवडणुकीच्या गप्पा करते, ती संस्था एकाही मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरळीत करू शकत नाही. आज मतदारांनी उष्मा, घुसमट होणे, विशेषतः काही निवडक मतदारसंघात मतदानाची संथ प्रक्रिया (बहुधा जाणूनबुजून आणि मतदारांवर दबाव टाकायला केलेली), गर्भवती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगा नसणं, पंखे, पाणी आणि सावलीचा अभाव या सगळ्यांमुळे नागरिक संतापले. आम्ही मुंबईकर उत्साहाने मतदान करायला घराबाहेर पडलो होतो. तुमच्या या जाणीवपूर्वक केलेल्या ढिसाळ नियोजनाने आम्हाला मतदानापासून परावृत्त करण्याचा वृथा प्रयत्न केला. पण, तरीही लोक बाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं. यालाच मुंबई म्हणतात, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांचं कौतुक केलं आहे.