अतुल परचुरे यांनी रंगवलेल्या भूमिका कायम लक्षात राहतील, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर तसेच मराठी चित्रपट रसिकांवर शोककळा पसरली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”आपल्या चतुरस्र अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत झालेले आणि मराठी माणसाच्या हृदयात स्थान मिळवलेले अभिनेते अतुल परचुरे ह्यांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी व अस्वस्थ करणारी आहे. त्यांनी रंगवलेल्या भूमिका कायम लक्षात राहतील. देव त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो! ॐ शांती”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व स्व. पु. ल‌. देशपांडे यांची संस्मरणीय भूमिका त्यांनी साकारली. याखेरीज त्यांनी टिव्हीवरील काही मालिकांमध्ये तसेच चित्रपटांत साकारलेल्या भूमिका देखील गाजल्या. ते गेली काही दिवसांपासून कर्करोगाचा सामना करीत होते. त्यांची ही झुंज अपयशी ठरली. अतुल परचुरे कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली.