मुंबईबद्दल प्रेम नसणारे अक्षम, बेकायदेशीर मुख्यमंत्री! आदित्य ठाकरे कडाडले; मिंधे सरकारचा घेतला समाचार

खरंतर मुंबई आणि मुंबईकर पावसाची आतुरतेनं वाट पाहात होते. मात्र रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसानं सोमवारी पहाटेपासून मुंबईकरांची दाणादाण उडवली. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं. त्यामुळे रस्ते आणि उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत झाली. नोकरदारवर्गाचे चांगलेच हाल झाले. शाळांना सुट्टी जाहीर करण्यावाचून पर्याय उरला नाही. इतकंच काय तर आमदारांनाही रेल्वेच्या ट्रॅकवरून पायपीट करावी लागली. यासगळ्या घटनेनंतर आता शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारचा समाचार घेतला आहे.

निवडणुकांच्या काळातच आदित्य ठाकरे यांनी पावसाळी काम खोळंबल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. मात्र तरी देखील सरकारनं सगळं लक्ष निवडणुकांवरच केंद्रीत केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत, तसेच मर्जीतल्या कंत्राटदारांनाच कामे दिले जात आहेत त्यामुळेचे मुंबईत अशी परिस्थिती उद्भवली असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एक भयंकर अक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री, मुंबईसाठीचे उत्तरदायीत्व नसलेला राज्यकारभार चालवत आहेत, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला लक्ष्य केलं आहे.

आपल्या X पोस्टमध्ये ते लिहितात की, पावसाळी कामांची पूर्व तयारी न केल्यानं आज बीएमसी उघडी पडली आहे.

2 वर्षे, निवडणूक नाही = जबाबदारी नाही.

2 वर्षे, 15 प्रभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रलंबित = जबाबदारी नाही.

2 वर्ष, आवडत्या कंत्राटदारांवर प्रेम, मुंबईवर नाही = लुट.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांचे प्रेम नाले साफसफाईऐवजी काम पाहणीवेळी कार्पेटवर उभे राहून फोटो काढण्यावरच आहे.

एक भयंकर अक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री, मुंबईचे उत्तरदायीत्व नसलेला राज्यकारभार चालवत आहेत.

पाण्याचा निचरा करणारे पंप, पंपिंग स्टेशन, पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या टाक्या, सर्वेक्षण अशा सर्व क्षमता असूनही आज पावसाने मुंबई विस्कळीत झाली आहे.

ते आम्हाला फक्त आपत्ती व्यवस्थापन कक्षातून फोटो देऊ शकतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

त्यासोबतच ‘वॉर्ड अधिकारी हे मिनी महापालिका आयुक्त असतात, त्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. आपण हे आधीही सांगितलं आहे, आणि पुन्हा पुन्हा सांगत आहे. अशा दिवशी मुंबई कशी चालवायची हे त्यांना माहीत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे.