आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी – आदित्य ठाकरे

बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात मंगळवारी बदलापूरकरांनी तब्बल आठ तास रेल रोको आंदोलन केलं. पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवले. यावेळी आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे तर हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. ”त्या आंदोलकांवरील गुन्हे राज्य सरकारने तत्काळ मागे घ्यावेत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी’, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”लोकांच्या मुद्द्यंवर अत्यंत संथगतीने काम करणाऱ्या सरकारविरोधात देशभरात नागरीक आंदोलन करत आहेत. काल जेव्हा बदलापूरातील चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरले. त्या आंदोलकांवर या मिंधे सरकारने लाठीचार्ज केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, शहरातली इंटरनेट सेवा बंद केली”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. यासोबत आदित्य ठाकरे यांनी काही मागण्या देखील केल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या मागण्या –

– आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्‍यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

– हजारो आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावे.

– तुझ्यावरच बलात्कार झाला अशाप्रकारे बातम्या देतेयस, असे धक्कादायक विधान करणाऱ्या मिंधे गटाच्या वामन म्हात्रे यांची हकालपट्टी करा

– बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय स्टंटबाजी म्हणणाऱ्या किसन कथोरे यांना निलंबीत करा.

– बदलापूरमधील इंटरनेट सेवा पूर्ववत करा