आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश, महापालिकेच्या भरतीतील क्लर्क पदासाठी पहिल्याच प्रयत्नात दहावी, ग्रॅज्युएट होण्याची अट रद्द

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट अखेर रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचे पालिकेतर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची मागणी करणारे पत्र शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले होते. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे -बापेरकर यांच्याकडूनही वरील मागणी करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

लवकरच नव्याने जाहिरात

सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.