रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम होणार नाही, आदित्य ठाकरे यांचा दणका; सरकार बॅकफूटवर

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही. मुंबईकरांना विरंगुळा म्हणून जागतिक दर्जाचे तीनशे एकरचे सेंट्रल गार्डन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

महालक्ष्मी रेसकोर्सची जागा राज्य सरकारकडून बिल्डर मित्रांच्या घशात घालण्याचा कट शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता. त्यानंतर राज्य सरकारने ही जागा अखेर पालिकेच्या ताब्यात दिली. आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्सच्या जागेसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पुढे सरकार नमले

रेसकोर्सची 120 एकरची जागा पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. यासंबंधीचे वृत दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताबाबत या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न केला. विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काय झाले त्यावर काही प्रॉब्लेम आहे का, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. रेसकोर्सच्या जागेवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क तयार करणार आहोत. आतापर्यंत तिथे रेसकोर्स होते. रेसकोर्सची 120 एकर जागा घेतली. या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही. कोस्टल रोडचे 180 एकर गार्डन होणार आहे आणि रेसकोर्सचे 120 एकर असे 300 एकरचे सेंट्रल पार्क मुंबईत होणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सरकारवर केलेल्या एकाही आरोपाला सत्ताधाऱयांनी उत्तर दिले नाही. हमीभाव, दुधाच्या दराच्या प्रश्नावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार मदतीला धावले तेव्हा त्यावर मी सभागृहात उत्तर देईन, असे सांगत मुख्यमंत्र्यांना प्रश्नाच्या सरबत्तीपासून वाचवले.

पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना थांबवले

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींचे आणि सरकारच्या कामाचे बराच वेळ काwतुक करीत होते. त्यांचे निवेदन खूपच लांबत गेल्यावर अखेर टीव्ही चॅनेलच्या प्रतिनिधींच्या संयमचा बांध सुटला आणि चॅनेलच्या पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांचे लांबलेले निवेदन मध्येच थांबवले आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.