CET परीक्षेत मोठा घोटाळा! आयुक्तांना निलंबित करून चौकशी करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

NEET आणि NET परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील CET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. सीईटी परीक्षेत पारदर्शकता यावी, या प्रकरणी चौकशी करावी आणि जे कमिश्नर आहेत त्यांना निलंबित करावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

सीईटी परीक्षा पैसे कमवण्यासाठी घेतली होती की मुलांचा तयारी पाहण्यासाठी घेतली होती, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ऐन पावसाळ्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर पोलीस भरती का घेतली जातेय? अशी शंकाही उपस्थित करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

CET ची परीक्षा देणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला फेरपरीक्षा नकोय. पण या परीक्षेत मोठा गोंधळ झालेला आहे. ही परीक्षा तुम्ही कशी घेतली? मार्क कसे दाखवले आणि जो काही निकाल लावला आहे, त्यावरनं गोंधळ उडालेला आहे. यावर सीईटीने नोटीस जारी केली आहे. तीस सेशनमध्ये सीईटीने दोन पेपर घेतले होते. इंजिनीआरिंगसाठीच्या सीईटीमध्ये 24 बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला. त्यात अर्थात वेगवेगळे प्रश्न होते. सिलॅबसही कोणाला सांगितला नव्हता. पण त्या चोवीस पेपरमध्ये अनेक वेगवेगळ्या बॅचेस बसल्यानंतर विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास फेरतपासणी एक हजार रूपये भरावे लागतात. सीईटीच्या या पेपरमध्ये 1425 हरकती घेतल्या गेल्या. त्यातून 14 लाख 25 हजार रूपये कमवले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सीईटीच्या पेपरमध्ये तब्बल 54 चुका आहेत. यामुळे ज्यांनी पेपर सेट केला त्यांचीच आधी परीक्षा घेतली पाहिजे. कारण त्यांची योग्यता काय आहे, हे समोर येईल. सीईटी सेलचे कमिश्नर कोण आहेत? त्यांना अद्याप निलंबित का केलं गेलं नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. निकालतही घोळ आहे. परीक्षेचे मार्क दिसत नाही तर टक्केवारी दिसतेय. काही ठिकाणी कमी गुण मिळून जास्त टक्के मिळालेत. तर काही बॅचमध्ये चांगले टक्के मिळूनही कमी गुण मिळाले आहेत. तुम्ही ही टक्केवारी कुठल्या आधारावर ठरवलेली आहे? हे विद्यार्थ्यांना सांगा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी सीईटीकडे केली.

या प्रकरणी सीईटीकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी एक स्पष्टकीरण दिले आहे. काही पेपर कठीण होते आणि काही पेपर सोपे होते, असे त्यांनी सांगितले. पण एकच पेपरची एन्ट्रन्स टेस्ट 24 बॅचमध्ये वेगवेगळी घेतली गेली. हे पेपर कठीण होते की सोपे? हे कोणी ठरवलं? कठीण पेपर, सोपा पेपर सेट कोण करतं? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.

परीक्षा घेतलेल्या 24 बॅचमधून टॉपर कोण आहे? हे कोणालाच माहिती नाही. खरं तर टक्केवारीची गरज नाही. पैसे दिले तर उत्तरपत्रिका मिळते. मग सीईटीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका का दिली जात नाही? यात देशाच्या सुरक्षेला धोका आहे का? अणुबॉम्बचं तंत्रज्ञान आहे का? का देत नाहीये उत्तरपत्रिका? तसेच 24 बॅचमध्ये कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा? परीक्षेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता कुठेच नाहीये. हाच प्रश्न सर्व विद्यार्थी विचारत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सीईटी परीक्षेत मेरीट आहे की नाही? तुम्हाला नक्की काय साधायचं आहे? तुम्ही टक्केवारीतून काय साधलं आहे? उच्च शिक्षणमंत्र्यांनी आम्हाला उत्तर द्यावं. त्यांना त्यांच्या खात्यात रस नसून दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष आहे. एकंदरच हे मिंधे सरकार, भाजप सरकार असेल यांनी देशातील विद्यार्थ्यांचं वाटोळं करायचं ठरवलं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, जे मार्क आहेत ते दाखवावेत, उत्तरपत्रिका द्याव्यात आणि जे टॉपर आहेत ते सांगावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. फेरतपासणीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले सर्व पैसे सरकारने परत द्यावे. जास्तीत जास्त चुका सीईटीकडून व्हाव्यात म्हणजे फेरतपासणीची मागणी होईल. फेरतपासणीची मागणी केल्यावर सीईटीची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील, हा मोठा घोटळा आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.