ठेकेदार ‘ब्लॅकलिस्ट’ करून एफआयआर करणार की पुन्हा मेहेरबानी करणार? रस्ते घोटाळय़ावरून आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक

पालिकेत 6 हजार कोटींचा ‘महा रस्ते घोटाळा’ उघड केल्यानंतर 2022-23 च्या टेंडरमधील रस्त्याची सर्व कामे थांबली आहेत. एका पंत्राटदाराचे पंत्राट दोन वेळा रद्द करण्यात आले आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या सदोष निविदा पद्धतीमुळे रस्त्याची कामे थांबली आहेत. त्यामुळे आता या ठेकेदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करून ‘एफआयआर’ दाखल करणार की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मित्रावर पुन्हा मेहेरबानी करणार, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांना केला आहे.

महापालिकेतील 6 हजार कोटींचा महाघोटाळा आपण उघड केल्यामुळे हा भ्रष्टाचार थांबला. एकेकाळी अतिरिक्त राखीव ठेवींसाठी ओळखली जाणारी मुंबई महानगरपालिका आता मात्र प्रशासकांच्या अधिपत्याखाली गेल्यानंतर आर्थिक स्थिती चिंताजनक झाल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. चार पंत्राटदारांना महापालिकेने 200 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड जानेवारी 2024 पर्यंत भरणे आवश्यक असताना तो अद्याप भरण्यात आलेला नाही. हे पंत्राटदार पालिकेकडून पैसे मिळाल्यानंतर दंड भरणार आहेत का, असा सवालही त्यांनी पालिका आयुक्तांना केला आहे. हा दंड संबंधित पंत्राटदाराकडूनच वसूल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्या अर्थी तुम्ही दंड वसूल करण्यात अपयशी आहात त्या अर्थी तुम्ही स्वेच्छेने किंवा मुख्यमंत्र्यांच्या सक्तीमुळे मुंबई शहराची नासाडी करीत आहात का, असा सडेतोड सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याबाबत तातडीने माहिती द्यावी, यासाठी त्यांनी पालिका आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्रही दिले आहे.

मुंबईची आतापर्यंत झालेली लूट पुरेशी नव्हती म्हणून खोके सरकारने महापालिकेला पुन्हा एकदा निविदा काढण्यास भाग पाडले आहे. मुंबईची निर्लज्जपणे लूट करण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे.
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

अशा आहेत मागण्या
– जानेवारी 2023 च्या निविदेनुसार वर्कऑर्डरनुसार ज्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त कामे केली नाहीत त्यांना पुन्हा निविदेत सहभागी होण्याची परवानगी देऊ नका.

– ज्या पंत्राटदारांनी पालिकेने केलेला दंड भरला नाही त्यांना पुन्हा निविदेत सहभागी
होण्याची परवानगी नको.

– दंड न भरणाऱया पंत्राटदारांना ‘ब्लॅकलिस्ट’ करा, महापालिकेकडे त्यांची असणारी देय रक्कम रोखा.